मराठी कथा, लेख

शनिवार, २१ फेब्रुवारी, २०२६

दुसरी बाजू भाग 3



 "जे झाले ते खरंच वाईट झाले पण आता यात आपण काही करू शकतो का? सुरेखाताईंच्या मुलाचा व प्राजक्ताचा संसार चांगला राहिला असता तर आपल्यालाही त्यात आनंदच होता. पण आता प्रकरण एवढे पुढे गेले आहे की, दोघांचा संसार होईल असे वाटत नाही. त्यामुळे घटस्फोट झाल्यावर सुरेखाताईंच्या मुलाला एखादी चांगली मुलगी मिळो आणि त्याचा संसार सुखाचा होवो.  एवढीच आपण देवाला प्रार्थना करू शकतो."


 कविता म्हणाली.


 "हो आपण एवढंच करू शकतो त्यांच्यासाठी. मला सांगत जा गं काही झाले तर.  मी दुसरीकडे राहायला गेली म्हणून परकी झाली का तुमच्यासाठी?"


 शीतल म्हणाली.


 "अगं, हे सर्व आम्हांला आता समजले आहे आणि तुला हे सांगण्यासाठी तू कधीची भेटली ही नाही ना आणि फोनवर पण काही बोलणे झाले नाही आपले कधीचे. आताही तू लग्नात भेटली म्हणून बोलणे झाले.  ते पण तू विषय काढला म्हणून.  बघू पुढे काय होते ते?  तसे सांगत जाऊ तुला आम्ही."


 रूपाली म्हणाली.


 पुरुष मंडळी घरी जाण्यासाठी घाई करू लागले.  हे पाहून ह्या सर्व मैत्रिणींनी आपल्या गप्पा थांबवल्या व एकमेकींचा निरोप घेतला.


 घरी जात असताना शीतलच्या डोक्यात तोच विषय होता.

 'प्राजक्ता अशी कशी वागू शकते? सुरेखाताईंनी जे सांगितले ते सर्व खरे असेलच का?  किंवा या प्रकरणाला दुसरीही बाजू असू शकते ना?'


 "शीतल, एवढा काय विचार करते आहेस? काही झाले आहे का?"


 शीतल आपल्या विचारात मग्न आहे. हे तिच्या चेहऱ्यावरून तिच्या नवऱ्याला समजले आणि त्याने तिला असे विचारले. 


 नवऱ्याने असे विचारल्यावर, शीतलने आता जे काही तिला कळले होते, ते सर्व नवऱ्याला सांगितले.

 तिने हे सर्व सांगितल्यावर त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य, दु:ख असे कोणतेच भाव उमटलेले नव्हते. त्याचा चेहरा शांत आणि निर्विकार दिसला. शीतलने त्याचा शांत चेहरा पाहून त्याला विचारले,


 "मी जे सांगितले ते ऐकून तुम्हांला काही  आश्चर्य वगैरे वाटले नाही?"


 "अगं घटस्फोट हा विषय आता कॉमन झालाय. माझा एक मित्र कोर्टात आहे तो सांगत होता, 'घटस्फोटाच्या रोजच किती केसेस येत असतात  आणि  खूप क्षुल्लक कारण असतात घटस्फोटाची. तू जे सांगितले ते ऐकून मला वेगळे काही वाटले नाही."


शीतलच्या नवऱ्याने शांतपणे उत्तर दिले.


 या विषयावर नवऱ्याशी जास्त काही न बोलता ती शांत राहिली. जरी शीतल शांत होती पण डोक्यात तिचे विचार सुरू होतेच.


क्रमश:

नलिनी बहाळकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काही शंका असल्यास , जरूर कळवा.

कृष्णप्रेम

 1) कान्हाच्या सावळ्या,सुंदर, मोहक मुखावर छान असे हास्य खुलते त्याच्या हास्यात एक वेगळीच जादू असते जी सर्वांना त्याच्या प्रेमाची भुरळ पाडते...