मराठी कथा, लेख

Breaking

मंगळवार, २४ फेब्रुवारी, २०२६

खेळ नशिबाचा भाग 3


 "अमृता, तू मला खूप आवडतेस. आय लव्ह यू."


हातात छान असे गुलाबाचे फूल घेऊन अमेय अमृताला म्हणाला.

 "अमेय, गंमत करतोय ना तू माझी? आतापर्यंत किती जणींना असे गुलाब दिले व प्रपोज केले? सांग बरं."


 अमृताने हसत हसत अमेयला विचारले.


"माझा स्वभाव मनमोकळा आहे. मी गंमतीजंमती करतो.  मी सर्वांसोबत मिळून मिसळून राहतो. सर्वांची थट्टा मस्करी करत राहतो. म्हणून तू असे म्हणते आहे का? पण मी खरंच तुझ्यावर प्रेम करतो गं. यात कोणती गंमत वगैरे नाही आणि मला हे ही माहित आहे की, तुझे पण माझ्यावर प्रेम आहे; पण हे सर्व तुला माझ्याकडून ऐकायचे होते ना!  म्हणून तू पुढाकार घेतला नाही. हे खरे आहे ना?"


अमेयच्या मनातील भाव शब्दांतून व्यक्त झाले होते.

 अमेयच्या डोळ्यांतील प्रेम, बोलण्यातील खरेपणा व आपल्या मनातील भाव त्याने ओळखले हे सर्व पाहून अमृतानेही अमेयवरील आपले प्रेम त्याच्यासमोर व्यक्त केले.


 इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असलेल्या अमेय व अमृताची मैत्री व नंतर प्रेम  दिवसेंदिवस छान बहरत गेले.



 शिक्षण पूर्ण झाल्यावर अमृता तिच्या गावी एका कंपनीत नोकरीला लागली.


 अमेय मुंबईला एका कंपनीत नोकरी करू लागला. पण तो एवढ्याने समाधानी नव्हता. स्वतःचा एक चांगला बिझनेस सुरू करायचा या हेतूने तो पैसे व  आवश्यक ज्ञान मिळवण्याची धडपड करत होता.



काही वर्षांनी जेव्हा अमृताच्या घरात तिच्या लग्नाचा विषय सुरू झाला, तेव्हा अमृताने अमेयविषयी आपल्या आई वडिलांना सांगितले.


अमेयने अगोदरच अमृताविषयी आपल्या घरात सांगितले होते.


 अमेयला भेटल्यावर अमृताच्या आई-बाबांना तो खूप आवडला होता आणि त्यांनी अमृता व अमेयच्या प्रेमाला स्वीकारलेही होते.

  अमेयच्या आईवडिलांना अमृता तर खूप आवडली होती. लग्न करून आपल्या घरी ती कधी येते? याची ते वाट पाहत होते.


 असे सर्व काही छान सुरू होते आणि लवकरच लग्नाचेही ठरणार होते.



पण अमृता व अमेयच्या नशिबात हे सुख नव्हते. 


 एके दिवशी अमृताला अमेयच्या मित्राच्या फोनवरून अमेयच्या आत्महत्येची बातमी समजली. अमृतासाठी हा खूप मोठा धक्का होता.  ती हा धक्का सहन करू शकली नाही.  तिची तब्येत बिघडली.  ती काही  बोलतही नव्हती, रडतही नव्हती. श्वास घ्यायलाही तिला त्रास होत होता. त्यावेळी ती नेमकी घरी होती, त्यामुळे तिच्या आई-वडिलांनी तिची अवस्था पाहिली व तेही खूप घाबरले पण प्रसंगावधान ठेवत त्यांनी स्वतःला सावरले. तिला हॉस्पिटलमध्ये नेले व डॉक्टरांनी ट्रीटमेंट सुरू केली आणि काही टेस्टही करून घेतल्या. 



"अमेय, अमेय... कुठे चाललास तू? मला सोडून नको जाऊ ना.. तुझ्याशिवाय कशी राहू मी? अमेय, अमेय..."


 अमृताचे तोंडातून असे शब्द ऐकताच तिचे आईबाबा तिच्याजवळ गेले. अमृताच्या डोळ्यांतून सारखे अश्रू येत होते व तोंडात 'अमेय अमेय...' हे शब्द होते.  तिची ही व्यवस्था तिच्या आई-बाबांकडून बघितली जात नव्हती. आपल्या मुलीला कसे सावरावे? हा मोठा प्रश्न तिच्या आई-वडिलांसमोर होता.



क्रमश:

नलिनी बहाळकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काही शंका असल्यास , जरूर कळवा.

धार्मिक अधर्मी

 "किती अभद्र विचार आहेत गं या माणसाचे!"   पल्लवी आपल्या मैत्रिणीला अनिताला म्हणाली.   "आता गाडी घेऊन गेला तोच ना?"  अनित...