काही महिन्यांनी,
शीतलला तिच्या जुन्या बिल्डिंगमधील मैत्रिण रूपाली कडून कळले की, सुरेखाताईंच्या मुलाचा घटस्फोट झाला आहे आणि त्याचे दुसरे लग्नही झाले.
हे ऐकून शीतलला त्याचा घटस्फोट झाला याचे वाईट वाटले; पण त्याचे दुसरे लग्न झाले. यामुळे चांगलेही वाटले. 'आता तरी त्याचा संसार सुखाचा होवो.' असे शीतलने मनात म्हटले.
एखाद्याच्या आयुष्यात पहिल्या लग्नाचा वाईट अनुभव आल्यावर दुसरे लग्न झाल्यावर सुखाचा अनुभव येतो. मग प्रश्न पडतो की, अगोदरच हे दोघे एकमेकांच्या आयुष्यात का नाही आले? म्हणजे पहिले लग्न, घटस्फोट व मग पुन्हा लग्न हे सर्व झाले नसते.
असो,
जीवनात असे खूप सारे प्रश्न असतात, ज्यांची उत्तरे आपल्याकडे नसतात. आपल्या हातात फक्त प्रयत्न करत जीवन जगणे असते.
सुरेखाताईंनी नव्या सुनेची पहिली संक्रांत केली. तेव्हा शीतलला हळदी कुंकवाला बोलावले.
ही पण सून सुरेखाताईंना चांगली भेटली होती. याप्रसंगी शीतलला प्राजक्ताची आठवण आली.
'तिच्यावर जे आरोप झाले होते ते सर्व खरे आहेत का? प्राजक्ताला विचारू या' असा विचार शीतलच्या मनात यायचा पण तिचा फोन नंबर तिच्याकडे नव्हता आणि कोणाकडून घेतला तर उगाच आपण अडचणीत येऊ असे शीतलला वाटायचे. म्हणून तिने तसा काही प्रयत्न केला नाही.
प्राजक्ताचा विचार हळूहळू शीतलच्या डोक्यातून निघून गेला आणि ती आपल्या इतर गोष्टीत रमू लागली.
एक दोन वर्षांनंतर,
एकदा नवऱ्याच्या मित्राच्या मुलाच्या लग्नाला शीतल नवऱ्यासोबत गेली होती.
तिथे,
"शीतल काकी, कशा आहात तुम्ही?"
शीतलला एका स्त्रीने आवाज दिला.
शीतलने पाहिले तर ती प्राजक्ता होती. तिला पाहून शीतलला खूप आनंद झाला.
"प्राजक्ता कशी आहेस तू?"
शीतलने काळजीने विचारले.
"मी मजेत. कशी दिसते आहेस!"
प्राजक्ताने आनंदाने सांगितले.
प्राजक्ता अगोदरपेक्षा खूप सुंदर व आनंदी दिसत होती.
शीतल तिला अजून काही विचारणार त्या अगोदरच प्राजक्ता स्वतःहून तिला म्हणाली,
"काकी, तुम्हांला सर्वांना त्या लोकांनी असे सांगितले होते ना की, माझे बाहेर कुठे अफेअर आहे आणि मी माझ्या नवऱ्यावर संशय वगैरे घेते असे."
शीतलने फक्त होकारार्थी मान हलवली.
"तुम्हांलाच नाही तर सर्व नात्यात व ओळखीच्या लोकांना त्यांनी हेच सांगितले. हे सर्व सांगून त्यांनी मला बदनाम केले व स्वतःच्या मुलाच्या चुकांवर पांघरून घातले. त्यांनी समाजाला फक्त एकच बाजू दाखवली दुसरी बाजू कधी सांगितलीच नाही. माझा नवरा दारू प्यायचा. त्याचे लग्नाअगोदर एका मुलीसोबत अफेअर होते आणि लग्नानंतर देखील ते सुरूच होते. मी त्याला व घरातल्यांना खूप समजावून सांगितले पण काही सुधारणा होत नव्हती. मी माझा संसार वाचवण्याचा खूप प्रयत्न केला पण शेवटी नाईलाजाने मला घटस्फोट घ्यावा लागला. या सर्वांत मला बदनामी व मानसिक त्रास खूप झाला.
पण माझे नशीब खूप चांगले म्हणा की, मी ज्याच्याबरोबर दुसरे लग्न केले तो खूप सुंदर, निर्व्यसनी व स्वभावाने खूप चांगला असा भेटला. यामुळे मी पहिल्याचे सर्व दुःख विसरून गेले."
प्राजक्ताने तिच्या नवऱ्याशी शीतलची व शीतलच्या नवऱ्याची ओळख करून दिली.
तो ही प्राजक्तासारखाच आनंदी दिसत होता.
दोघांचे आनंदी चेहरे पाहून शीतलला व तिच्या नवऱ्याला समाधान वाटले.
प्राजक्ताच्या नवऱ्याचे काही नाते होते म्हणून तेही या लग्नाला आलेले होते आणि त्यानिमित्ताने प्राजक्ताची व शीतलची भेट झाली.
यामुळे शीतलच्या मनातील प्राजक्ताच्या बाबतीत जी दुसरी बाजू होती ती तिला कळली होती.
समाप्त
नलिनी बहाळकर

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
काही शंका असल्यास , जरूर कळवा.