मराठी कथा, लेख

Breaking

बुधवार, २९ जुलै, २०२६

आईचा त्याग


 "आई, आई, तुझा जय आला बघं. आता  तू लवकर बरी होशील  आणि तू बोलत का नाहीयेस?  आई, बोल ना माझ्याशी..."


 जय आपल्या आईशी बोलत होता.


 "ऊठ ना रे जय,  किती वेळ झोपतोस?"


 रिया जयला झोपेतून उठवत म्हणाली.


 रियाचा आवाज ऐकताच जय झोपेतून उठला आणि आजूबाजूला पाहू लागला.


 'म्हणजे आता मी पाहिले ते स्वप्न होते. स्वप्नात मी एकटाच बोलत होतो. आई काहीच बोलत नव्हती. माझ्यावर रागावली आहे की काय?'


 जय मनात विचार करू लागला.


 जयच्या चेहऱ्यावरील भाव ओळखून त्याच्या पत्नीने रियाने त्याला विचारले,


 "जय,काय विचार करतो आहेस? एवढा चांगला जॉब सोडून भारतात नाही जायचे ठरले आहे ना आपले!"


 "अगं,  आईला मी अशा अवस्थेत नाही पाहू शकत. तिला माझी गरज आहे.  मी तिकडे गेल्यावर ती बरी होईल, आनंदी होईल. असे माझ्या मनाला वाटते आहे. मला स्वप्नही तशीच दिसत आहेत."


 जयने आपल्या मनातल्या भावना रियाला सांगितल्या.


 "अरे, आईंची काळजी घेण्यासाठी  पूर्ण वेळासाठी आपण एक चांगली केअरटेकर ठेवली आहे ना?  ती आईंची चांगली काळजी घेते. असे  बाबा  सांगत असतात. बाबा पण काळजी घेतात आणि काही गरज असली तर दोन्ही ताई आहेतच तिथे.  एवढं सर्व व्यवस्थित असताना तू का जास्तीची काळजी करतोय?"


 रिया जयला समजावत म्हणाली.


 "तुझे सर्व म्हणणे बरोबर आहे. आपण आईसाठी हॉस्पिटल, मेडिसिन  व केअरटेकर या सर्व गोष्टी करत आहोत. पैशांचा विचार करत नाही आहोत. तिथे बाबा पण आहेत आणि दोन्ही ताई व त्यांच्या घरातील लोकही खूप मदत करत आहेत. त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही. तरीही एवढे सर्व व्यवस्थित असताना माझे मन इथे स्वस्थ बसत नाही आहे. मी भारतात जावं हाच विचार मनात येत असतो."


 जय दु:खी चेहऱ्याने  रियाला म्हणाला.


 "जय, तू मला सांगितले होते की, तू खूप शिकावे अशी आईंचीच इच्छा होती. आईंचे हे स्वप्न होते आणि ते तू पूर्णही केले. त्याचा त्यांना खूप आनंदही झाला. परदेशात नोकरी करण्याचे तुझे स्वप्न जेव्हा तू त्यांना सांगितले तेव्हाही त्यांनी तुला आनंदाने परदेशात पाठवले.

 आपण इकडे आपल्यासोबत आई-बाबांना आणणार होतो; पण ते इकडे यायला नाही म्हणाले."


रिया जयला म्हणाली.



 "हो, आम्ही तिन्ही बहीण भावंडांनी उच्च शिक्षण घ्यावं, चांगली नोकरी करावी. अशी आई बाबांची इच्छा होती. त्यांचे हेच स्वप्न होते आणि आम्ही तिघांनी ते पूर्णही केले. त्याचा आई बाबांना खूप आनंदही आहे. आणि परदेशात नोकरी करण्याचे माझे स्वप्न होते, ते आई-बाबांच्या  परवानगीनेच मी पूर्ण केले. याचाही आईबाबांना आनंद आहे. सर्व काही व्यवस्थित सुरू होते. पण आई एके दिवशी अचानक घरात पडली  आणि पायाचे ऑपरेशनही करावे लागले. यातून आई लवकर बरी होईल आणि अगोदरसारखी व्यवस्थित होईल. असे आपल्या सर्वांना वाटत होते; पण लवकर बरी होण्याऐवजी तिची तब्येत दिवसेंदिवस अजून बिघडत चालली आहे. डॉक्टर  व्यवस्थित उपचार करत आहेत. आपण तिच्यासाठी चांगल्यातले चांगले उपचार आणि सुविधा देत आहोत. दोन्ही ताई, बाबा आणि आपणही तिची योग्य प्रकारे काळजी घेत आहोत; पण तरीही तिच्या तब्येतीत सुधारणा  होत नाही आहे.  तिच्या मनात काय आहे?  हे ती मनमोकळेपणाने सांगत नाही. आपण परदेशात आलो याचा तिला आनंद झाला  असे ती फक्त वरवर  दाखवत असेल का? मनात काही वेगळे आहे का? आपल्या मुलाने, सुनेने  आपल्याजवळ राहावे असे तिला वाटत असावे; पण ती आपल्या आनंदासाठी तिची इच्छा दाबून टाकत असावी. असे मला वाटते आहे. माझे मन मला असे सारखे सांगत आहे. म्हणून तिला आनंद देण्यासाठी व ती लवकर बरी व्हावी यासाठी मी  इकडची नोकरी सोडून भारतात जाण्याचा निर्णय घेत आहे. आई-बाबांनी आमच्या सुखासाठी, आनंदासाठी आयुष्यभर  त्यांच्या सुखाचा, आनंदाचा त्याग केला. आता त्यांच्या आनंदासाठी मी माझ्या सुखाचा थोडासा त्याग केला तर  मलाही बरे वाटेल."


 जय भावनिकतेने रियाला म्हणाला.


 "जय,  मला वाटते तू खूप भावनिक होतो आहे आणि त्यामुळेच तू असा विचार करत आहे. तुझ्या निर्णयाचा नंतर तुला पश्चाताप होऊ नये. असेच मला वाटते आहे. समजा तू इकडची नोकरी सोडून आपण भारतात गेलोही आणि तरी आईंच्या तब्येतीत सुधारणा नाही झाली तर? 

 तुझी बायको म्हणून मी तुला समजवण्याचा खूप प्रयत्न  करते  आहे. दोन्ही ताई पण तुला हेच सांगत आहेत.  शेवटी निर्णय तुझाच आहे. डोकं शांत ठेवून निर्णय घे. घाई करू नको."


रिया जयला विनवणीच्या स्वरात म्हणाली.


 'देवा, जयला सद्बुद्धी दे.'


मनातल्या मनात देवाला प्रार्थना करत रिया आपल्या कामाला लागली.


 'देवा, माझ्या आईला लवकर बरं कर.'


देवाला मनापासून प्रार्थना करत जयही आपल्या पुढच्या तयारीला लागला.




 चार-पाच दिवसांनंतर,



 "जय, काय झाले?कोणाचा फोन होता?"


 जयला रडताना पाहून रियाने त्याला विचारले.



 "रिया, आई  आपल्याला कायमची सोडून गेली गं. तिच्यासाठी मी इकडचे सर्व सोडून तिच्याजवळ जाणार होतो; पण तिने ती वेळच येऊ दिली नाही. आपल्या मुलाने आपल्यासाठी काही करू नये असा विचार  तिने केला असेल का? आयुष्यभर आमचा विचार करत राहिली आणि आताही तेच केलं. माझ्या स्वप्नासाठी स्वतःच्या इच्छांचा, स्वप्नांचा तिने विचार केला नाही आणि आता तर तिने तिच्या आयुष्याचाच त्याग केला. आईचे प्रेम, माया व त्याग हे पैशांनी विकत घेता येत नाही. ते खूप अनमोल असते. हे आज आईने पुन्हा सिद्ध करून दिले."


 जय रडत रडत रियाला म्हणाला.




समाप्त 

नलिनी बहाळकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काही शंका असल्यास , जरूर कळवा.

आईचा त्याग

 "आई, आई, तुझा जय आला बघं. आता  तू लवकर बरी होशील  आणि तू बोलत का नाहीयेस?  आई, बोल ना माझ्याशी..."  जय आपल्या आईशी बोलत होता.  ...