मराठी कथा, लेख

शुक्रवार, २९ डिसेंबर, २०२३

प्रेमाची परीक्षा ( भाग 1 )



"का गं दीपाली ..का हसते आहेस?" कविताने आपली मैत्रीण दीपालीस विचारले.


"हसू नको तर काय करू? तुला पण हसू येणार तिला बघितल्यावर." दीपाली हसत हसतच कविताला म्हणाली.


"कोणाला गं ?" कविताने विचारले.


"ती बघ काकूबाई..."  कॉलेजच्या गेटमधून आत येणाऱ्या स्वातीकडे पाहून दीपाली म्हणाली.


"मगं त्यात काय गं हसण्यासारखं?"  -   कविता


"का गं, तुला नाही हसू येत तिला पाहून? आम्ही सर्व तर खूप हसतो. राहते तर काकूबाईसारखे आणि बोलताना ही किती घाबरते,नेहमीच गोंधळलेली दिसते.कोणाशी जास्त बोलत पण नाही." - दीपाली


दीपालीचे हे बोलणे ऐकून कविता म्हणाली,


"अगं दीपाली,असे म्हणतात की,

'Don't judge a book by its cover' 


पुस्तकाच्या आवरणावरून जसे कळत नाही की,पुस्तकात काय वाचायला मिळेल ..पुस्तक वाचल्यानंतरच कळते की पुस्तक कसे आहे ते !

तसेच ,

व्यक्तिच्या राहणीमानावरून लगेच तिच्या स्वभावाचा,गुणांचा अंदाज येत नाही. त्या व्यक्तिशी बोलल्यावर,तिच्या सोबतच्या सहवासातून कळत जाते..ती व्यक्ती स्वभावाने, गुणाने कशी आहे ते!

अगं, तिच्या राहणीमानावरून, वागण्यावरून तुम्ही तिला हसत आहात पण ती खूप चांगली मुलगी आहे. परवा ती आणि मी कॉलेज सुटल्यानंतर बरोबरच घरी गेलो.जाताना आम्ही खूप गप्पा मारल्या. तेव्हा कळले की, तिचे दहावीपर्यंतचे शिक्षण एका खेडेगावात झाले आहे. तिचे वडील शेतकरी आहेत. ती तिच्या शाळेत पहिली आली आहे.तिच्या गावात दहावीपर्यंतच शिक्षण आहे,म्हणून पुढील शिक्षणासाठी ती येथे आली आहे आणि मावशीच्या घरी राहते आहे.खेड्यातील जीवनमान,घरातील वातावरण याचा तिच्या राहणीमानावर व वागण्यावर परिणाम होईलच ना ? आपल्या बोलण्याला,वागण्याला दुसरे हसतील ..या भीतीने ती बोलताना, वागताना अशी गोंधळलेली असते. तिला शहरी वातावरणात रूळायला थोडा वेळ लागेलच ना ?" कविताने दीपालीला समजावून सांगितले.


"हो, हो बरोबर आहे तुझं."  - दीपालीने कवितेच्या बोलण्याला दुजोरा दिला.


स्वातीलाही कळत होते,तिच्या बोलण्याला,वागण्याला इतर मुली हसतात.तिची टिंगल करतात. मुळात आपला स्वभाव खूप शांत. आणि आपल्यावर  हसणाऱ्यांना काही बोलण्याची,त्यांच्याशी वाद करण्याची हिंमत आपल्यात तरी नाही. आपण आपले काम करत रहावे, ते त्यांचे काम करत आहेत. असे समजून स्वाती अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करत होती.

स्वातीला शिक्षणाची आवड होती.अभ्यासात ती हुशार होती. तिच्या आईबाबांचे स्वप्न होते की, स्वातीने शिक्षिका व्हावे. आपल्या आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करून तिला त्यांना आनंद द्यायचा होता.एवढेच तिच्या मनात होते आणि त्यासाठी ती मन लावून अभ्यासही करत होती.अभ्यासाव्यतिरिक्त इतर कोणत्याही गोष्टींकडे ती लक्षही देत नव्हती.

मुलींशी बोलतानाच स्वाती इतकी घाबरत होती;आणि मग  मुलांशी बोलण्याचा तर प्रश्नच येत नव्हता!मुलांशी बोलणे तर दूरच, त्यांच्याकडे बघतही नव्हती.


खेडेगावात सहसा मुले-मुली एकमेकांशी जास्त बोलत नाही. समजा,कोणी मुलगा-मुलगी एकमेकांशी  बोलू लागले तर लगेच गावात त्यांच्याविषयी नको त्या अफवा पसरविल्या जातात.आईवडील ही आपल्या मुलींना मुलांपासून दूरच राहण्यास सांगतात.


स्वातीने आपल्या गावात हे सर्व ऐकलेले होते,पाहिलेले होते आणि तिच्या घरात तिला सांगितले होतेच, "शहरात फक्त शिक्षणासाठी जाते आहे;त्यामुळे फक्त अभ्यासाकडे लक्ष द्यायचे. आईवडिलांना कौतुक वाटेल असेच वागायचे. आईवडिलांना आपल्या मुळे शरमेने मान खाली करावी लागेल, असे काहीही करायचे नाही."

गावातील वातावरण,आईवडीलांच्या अपेक्षा आणि शांत स्वभाव या सर्वांचा एकत्रित परिणाम की काय? स्वाती कोणाशी जास्त बोलत नव्हती. फक्त अभ्यास एक अभ्यास..असचं तिचे वागणे सुरू होते.




"सीमा, सांग बरं तू जे आता उत्तर सांगितले ..ते कसे आले ते ?"


कॉलेजमध्ये गणिताच्या सरांनी सीमाला विचारले.


सीमाने तर उत्तर बरोबर सांगितले होते.पण कसे आले ते तिला सांगता येणार नव्हते. कारण तिने स्वातीचे आलेले उत्तर पाहून सांगितले होते.


" सॉरी सर, माझे हे उत्तर स्वतः चे नाही, मी स्वातीचे पाहून सांगितले."


सीमाने सरांना खरे सांगून आपल्या चुकीची माफी मागितली.


सरांनी स्वातीला उत्तर कसे आले ते सांगण्यास सांगितले.


आपले उत्तर बरोबर आहे आणि कसे आले ते पण मला माहीत आहे;पण सरांना सांगायला आपण का घाबरत आहोत? आपल्याला सर्व हसतील की सर काही बोलतील ? ही भीती स्वातीच्या मनात असल्याने; ती खाली मान करून शांत उभी होती. सरांनी पुन्हा एकदा विचारले.

मग मनात थोडीशी हिंमत करून स्वातीने उत्तर कसे आले ते सांगितले. तिचे उत्तर ऐकून सर  'व्हेरी गुड' म्हणाले आणि तिला खाली बसण्यास सांगितले. वर्गातील सर्वजण स्वातीकडे बघतचं राहिले. स्वाती इतके छान बोलू शकते, यावर कोणाचाच विश्वास बसत नव्हता. त्यामुळे सर्वजण आश्चर्याने तिच्याकडे बघत होते. आणि या सर्वांमध्ये एक व्यक्ती अशी होती की, त्या व्यक्तीला आश्चर्यासोबत खूप आनंदही झाला होता.


क्रमशः 


नलिनी बहाळकर 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काही शंका असल्यास , जरूर कळवा.

कृष्णप्रेम

 1) कान्हाच्या सावळ्या,सुंदर, मोहक मुखावर छान असे हास्य खुलते त्याच्या हास्यात एक वेगळीच जादू असते जी सर्वांना त्याच्या प्रेमाची भुरळ पाडते...