मराठी कथा, लेख

शुक्रवार, २९ डिसेंबर, २०२३

प्रेमाची परीक्षा ( भाग 2 )


"हाय स्वप्नील,कसा आहेस?"सोनल स्वप्नीलला म्हणाली.


"हाय सोनल, मी मस्त व  मजेत.आणि तू कशी आहेस?" - स्वप्नीलनेही सोनलला विचारले.


"मी पण मजेत" -  सोनल म्हणाली.


कॉलेजला जात असताना सोनलला स्वप्नील दिसला आणि दोघेही गप्पा मारत मारत कॉलेजला पोहोचले.कॉलेजमध्ये सायकल स्टॅन्डला सायकल लावत असताना, तिथे बाकीचे क्लासमेट्सही होते. मुले आणि मुली दोघेही. त्यांनी  स्वप्नील व सोनलशी हाय,हॅलो केले आणि सर्वजण गप्पा मारत क्लासमध्ये गेले.

यात फक्त स्वातीच अशी होती की, जी स्वप्नीलशी बोलली नव्हती.वर्गातील सर्व मुली, मुलांशी बोलतात आणि स्वप्नीलशी तर छानच बोलतात. हे स्वातीने पाहिले होते. तिला यात वेगळे असे काही वाटलेच नाही. कारण गावातील मुलींपेक्षा शहरातील मुलींचे वागणे थोडे वेगळे असते. हे तिला माहित होते. 


स्वप्नील दिसायला तर खूप छान होताच आणि बोलक्या स्वभावामुळे त्याची पटकन इतरांशी  मैत्रीही व्हायची.पण स्वातीशी अजून त्याचे बोलणे झाले नव्हते. मुलींप्रमाणे मुलेही स्वातीच्या वागण्याला हसायचे.स्वप्नीललाही हसू यायचे.पण त्याच्या मनाला वाईटही वाटायचे.आणि त्या दिवशी तिने सरांना सांगितले उत्तर ऐकून त्याला आश्चर्याबरोबर आनंद ही झाला होता. या आनंदामागचे कारण काय ? हे त्याला कळत नव्हते.


रोज कॉलेजला वेळेत पोहोचणारी स्वाती, सायकलच्या प्रॉब्लेममुळे आज कॉलेजला थोडी लेट पोहोचली होती.सायकल स्टॅन्डला सायकल लावत असताना,तिला 'आई गं..' असा आवाज ऐकू आला.तिने पाहिले तर तिच्या जवळच स्वप्नील सायकल लावत होता आणि घाईघाईने सायकल लावत असताना त्याला हाताला काहीतरी लागले होते,आणि त्यातून रक्त येत होते.कोणताही विचार न करता स्वातीने पटकन आपल्या जवळील हातरूमालाने जखमेच्या आजूबाजूचे रक्त पुसले आणि जवळच  असलेल्या कॉलेज  कॅन्टीनमधून हळद आणून जखमेवर लावले.पुन्हा आजुबाजूचे रक्त पुसले.जखमेवर बांधण्यासाठी स्वप्नीलने आपला हातरुमाल स्वातीकडे दिला. तिने तो जखमेवर बांधूनही  दिला.हे सर्व करत असताना स्वातीने एकदाही स्वप्नीलकडे पाहिले नाही. फक्त मनापासून तिचे काम ती करत होती. आजूबाजूचे कोणी आपल्याला पाहत आहे का? हा ही विचार तिच्या मनात आला नाही.स्वाती मन लावून जे करत होती,ते सर्व स्वप्नील डोळ्यांनी पाहत होता आणि मनाने काही वेगळीच भावना अनुभवत होता.आजपर्यंत जी कधीही अनुभवली नव्हती अशी भावना!



दोघेही वर्गाकडे गेले पण दोघेही एकदम शांत ..जणू काही झालेच नाही असे समजून!

दोघेही कधीच लेट येत नाही व दोघेही अभ्यासात हुशार. म्हणून सरांनीही दोघांना पहिली चूक समजून वर्गात येण्याची परवानगी दिली.


 स्वातीचे लक्ष सरांच्या शिकविण्याकडे आणि  स्वप्नीलचे लक्ष सरांकडे कमी...स्वातीकडे जास्त!


'मी सर्व मुलींशी किती छान व मनमोकळेपणाने बोलतो, त्याही माझ्याशी छान बोलतात. पण आज जे वाटले ते यापूर्वी कधीच कोणाच्या बाबतीत मला वाटले नाही.आज स्वातीला पाहून एक वेगळीच भावना मनात निर्माण झाली.ती काय करत होती हे शरीराला जाणवत होते पण मन तर वेगळ्याच विश्वात फिरत होते.हाताचे रक्त पुसताना,जखमेवर हळद लावताना, रूमाल बांधताना तिच्या  हाताचा होणारा स्पर्श ह्रदयाची धडधड वाढवत होता.एक मित्र व मैत्रीण अशी ही भावना नव्हतीच. तर काही तरी एक वेगळीच जाणीव, भावना होती... या जाणीवेलाच ,भावनेलाच प्रेम म्हणतात का? 

 

एका मनाचं दुसऱ्या मनाशी असलेलं एक सुंदर व नाजूक  नातं!


कदाचित यामुळेच माझ्या मनाला वाईट वाटते ,त्रास होतो...जेव्हा  कोणी तिला हसतात,तिच्या बद्दल काही वाईट बोलतात.आणि त्या दिवशी तिने सरांना दिलेल्या उत्तरामुळे माझ्या मनाला झालेला तो आनंद! 


मला जसे वाटते आहे..तसेच तिलाही माझ्याबद्दल वाटत असेल का? पण तिच्या मनातले मला तरी  कसे समजणार? ती तर कोणाशी जास्त बोलतही नाही आणि माझ्याबद्दल अशी भावना तिच्या मनात असली तरी ती व्यक्त करेल का?'


स्वातीच्या राहणीमानात,वागण्यात,

बोलण्यात हळूहळू बदल होत होता तरी ती इतर मुलींप्रमाणे मुलांशी बिनधास्तपणे बोलत नव्हती. कधी मुलांशी बोलण्याचा प्रसंग आला तर..कामापुरते आणि तेही मोजकेच बोलायची.


स्वप्नीलचेही नेहमीप्रमाणे रूटीन सुरू होते.स्वातीशी बोलण्याचा प्रयत्न करायचाही पण नेहमीप्रमाणे अपेक्षाभंगच व्हायचा! 


क्रमशः


नलिनी बहाळकर 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काही शंका असल्यास , जरूर कळवा.

कृष्णप्रेम

 1) कान्हाच्या सावळ्या,सुंदर, मोहक मुखावर छान असे हास्य खुलते त्याच्या हास्यात एक वेगळीच जादू असते जी सर्वांना त्याच्या प्रेमाची भुरळ पाडते...