कॉलेज,अभ्यास, मौजमजा करता करता 11 वी.चे वर्ष आणि नंतर 12 वी.चेही वर्ष संपत आले.12 वी. नंतर कोणी डॉक्टर,कोणी इंजिनिअर, कोणी शिक्षक तर कोणी अजून काही होणार.. प्रत्येक जण वेगवेगळ्या ठिकाणी जाणार. पुन्हा सर्व एकत्र येतील ,पुन्हा सर्वांची भेट होईल ..सांगता येत नव्हते. त्यामुळे शेवटचा पेपर झाल्यानंतर,सर्वांनी पार्टी करून एन्जॉय करायचे ठरवले.स्वातीला घरी लवकर जायचे होते आणि तिला या गोष्टींची आवडही नव्हती. त्यामुळे पेपर संपल्यानंतर मैत्रीणींशी बोलून ती घरी जायला निघाली.
"स्वाती,स्वाती..थांब, मला तुझ्याशी काही बोलायचे आहे." तिला मागून आवाज आला.
तिने मागे वळून पाहिले तर..स्वप्नील तिला आवाज देत होता.
"काय झाले स्वप्नील? आवाज का देतो आहेस?" -- स्वातीने विचारले.
"स्वाती, I Love You ..मला तू खूप आवडतेस आणि माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे." आपल्या मनातील प्रेमाला शब्दरूप देवून स्वप्नीलने स्वातीजवळ आपले प्रेम व्यक्त केले.
"Are You Joking? .. काय बोलतो आहेस प्रेम आणि माझ्यावर..वर्गातल्या एवढ्या सुंदर मुली सोडून तू मला प्रपोझ करतो आहेस..तू माझी गंमत करतो आहेस ना ?" स्वाती स्वप्नीलला म्हणाली.
"नाही गं मी तुझी गंमत नाही करत आहे. सिरीयसली मी फक्त तुझ्यावरच प्रेम करतो.खूप दिवसापासून मनात होतं आणि तुझ्यासमोर ते व्यक्त करायच होतं.तुझ्याशी बोलण्याचा अनेकदा प्रयत्नही केला;पण तू कधी तशी संधीच दिली नाही. मी 12 वी. नंतर इंजिनिअरिंगला जाणार आहे.आता यापुढे मी कुठे आणि तू कुठे असशील त्यामुळे पुन्हा आपली भेट होईल की नाही सांगता येणार नाही. आजची ही शेवटची भेट आणि शेवटची संधी म्हणून मनातल्या भावना तुला सांगितल्या.मी जरी मुलींशी मोकळेपणाने बोलतो. पण ते मैत्रीच्या नात्याने..तुझ्याबद्दल जे वाटते..ते इतर कोणाबद्दल कधी वाटलेच नाही गं." स्वप्नील अगदी मनापासून बोलत होता.
"तु माझी गंमत करत नाही आहेस ना? माझ्यावर तुझे खरचं प्रेम असेल तर ..तुझे इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतरही माझ्यावरचे प्रेम कायम राहिले तर ..तरचं समजेल तू माझ्यावर खरचं प्रेम करतो आहेस. या चार वर्षात तुला नव्या मैत्रीणी भेटतील ज्या सुंदरही असतील , हुशारही असतील ..कदाचित त्यांच्यातील एखादी तुला आवडली तर ..मला तर तू विसरून जाशील ना? कोण स्वाती आणि कोणतं प्रेमं? बरोबर बोलते आहे ना मी ,स्वप्नील ? " स्वप्नीलच्या बोलण्यावर स्वातीला जे काही वाटले ते ती पटकन बोलली.
स्वाती एवढं सार बोलत होती आणि स्वप्नील फक्त तिच्याकडे बघत होता.
"मी काय बोलली ते कळले का? " स्वप्नीलकडे पाहत स्वातीने त्याला विचारले.
"हो, कळले ना..इंजिनिअरिंगला गेल्यावर तिथे एखादी मुलगी आवडली,तिच्यावर मी प्रेम करू लागलो तर तुला मी विसरणार..म्हणजे आता तुझ्यासमोर जे प्रेम व्यक्त केले ती तुझी गंमत केली..असे तुला वाटते आहे. मी एवढ्या मुलींशी बोलतो आणि त्यांच्यातील एखादीवर प्रेम नसून मी तुझ्यावर कसे प्रेम करतो आहे? अगं मैत्री आणि प्रेम यात फरक असतो. मैत्री माझी खूप जणांशी आहे ..पण प्रेम फक्त तुझ्यावरचं आहे. आणि प्रेम असे जाणूनबुजून होत नसते...ते आपोआपच होत असते." स्वप्नीलने आपली बाजू स्पष्टपणे सांगितली.
"पण मी यावर कसा विश्वास ठेवणार? " स्वातीने पुन्हा प्रश्न विचारला.
"तूचं सांग मी काय केले म्हणजे..तुझी खात्री होईल की, मी फक्त तुझ्यावरच प्रेम करतो." - स्वप्नील
"तू इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केल्यावरही मला विसरला नाही, आता माझ्या बद्दल जे वाटते...ते तेव्हाही वाटले ..तरचं मी समजेल की, तुझे माझ्यावरचं प्रेम आहे." - स्वाती
"म्हणजे तू माझी..माझ्या प्रेमाची परीक्षा घेणार आहेस तर ? " - स्वप्नील
"हो..हो असंच समज .." - स्वाती
"आणि समजा मी ही परीक्षा पास झालो ..तर तू मला काय देणार ? माझ्या मनातील भावना तर मी व्यक्त केल्या.पण तुझ्या मनात माझ्याविषयी काय आहे...ते मला कळलेच नाही.."
- स्वप्नील
"काहीच नाही.." असे बोलून स्वातीने पटकन सायकलीचा वेग घेतला आणि घराकडे गेली.
क्रमशः
नलिनी बहाळकर

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
काही शंका असल्यास , जरूर कळवा.