ठरल्याप्रमाणे, स्वप्नील प्रेमाची परीक्षा देण्यास तयार झाला.
"माझे स्वातीवर खरे प्रेम आहे आणि मी ही परीक्षा पास होणारच..स्वाती माझे प्रेम मान्य करेलच." हा आत्मविश्वास मनाशी घेऊनच स्वप्नील इंजीनिअरिंगच्या शिक्षणासाठी दुसऱ्या शहरात गेला.स्वातीची आठवण येणारच होती.पण भावनांना आवर घालून अभ्यास करावा लागणार होता. तिची कधी भेट होईल? तिच्याशी कधी बोलणे होईल? या विचाराने भावुकही व्हायचा. मित्रांकडून कळाले होते की, स्वातीने बारावीनंतर पुढे त्याच कॉलेजमध्ये बी.एस्सी. साठी ऍडमिशन घेतले आहे.त्यामुळे केव्हा तरी तिची भेट होईलच. नुसत्या या विचाराने देखील त्याच्या मनाला आनंद होत होता.
'स्वप्नीलने त्याच्याबद्दल मला काय वाटते? असे विचारल्यावर ..मी तर काहीच नाही असे बोलून घरी निघून आली.पण मी हे खरचं मनापासून बोलली होती? त्याला खोटे सांगून मी आपल्या मनातल्या भावनांना दाबण्याचा प्रयत्न केला.
तू ही मला आवडतोस, माझेही तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे... हे सर्व आपण त्याला का सांगू शकलो नाही. कारण माझ्या प्रेमापेक्षा मला माझ्या आईवडिलांचे स्वप्न जास्त महत्त्वाचे वाटले. आईवडिलांच्या माझ्याकडून असलेल्या अपेक्षांचा,स्वप्नांचा विचार करूनच मी माझ्या भावनांना त्याच्यासमोर शब्दरूपात व्यक्त करू शकले नाही.
तो तर प्रेमाची परीक्षा पास होईलच ..मला खात्री आहे. कारण त्याचे प्रेम खरे आहे, हे मला जाणवत होते.पण माझाही नाईलाज होता म्हणून स्पष्ट नकार न देता मी त्याला त्याच्या प्रेमाची परीक्षा देण्यास सांगितले.
आता देवाला एकच प्रार्थना करते की, त्याच्या आयुष्यात खूप चांगली मुलगी येऊ दे आणि त्याला माझा विसर पडू दे.
त्याच्या आठवणींनी मलाही त्रास होतोच आहे. पण भावनेपेक्षा कर्तव्य मोठे असते. यासाठी मला हा त्रास सहन करून अभ्यासात लक्ष द्यावे लागणारच.माझ्यासाठी ही खूप मोठी परीक्षा राहणार आहे.'
प्रेम,भावना,कर्तव्य यावर खूप विचार करूनच स्वातीने स्वप्नीलला विसरण्याचा प्रयत्न करत आपल्या आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने वाटचाल केली.
नेहमीप्रमाणे स्वाती कॉलेजच्या लायब्ररीतून पुस्तक घेऊन बाहेर निघाली आणि आपल्याच विचारात चालत असताना तिला समोर स्वप्नील दिसला. तो त्याच्या मित्रांसोबत गप्पा मारत होता.
तो दिसल्यावर मनातून तर खूप आनंद झाला होता. पण तसे काही न दाखवता, पाहिले न पाहिल्यासारखे करत ती पुढे जाऊ लागली.
तेवढ्यात तिच्या एका क्लासमेटने तिला आवाज दिला,
"स्वाती,बघं ना कोण आलं आहे...स्वप्नील. बारावीला आपल्या बरोबर होता.आम्हांला भेटायला आला. तू ओळखते ना त्याला ?"
काय करावे?काय बोलावे? स्वातीला काहीचं सूचत नव्हते.
"हो, ओळखते ना..कसा आहेस स्वप्नील? अभ्यास कसा सुरू आहे?"
असे जे काही सुचले ते स्वाती बोलली.बोलत असताना स्वप्नीलकडे पाहण्याचे टाळत होती.
"मी मजेत आहे,अभ्यासही छान सुरू आहे.अभ्यास,परीक्षा आणि रिझल्ट हेचं लक्ष डोळ्यासमोर सध्या असतं."
स्वप्नील तिच्याकडे बघून बोलत होता.
जास्त बोलले तर काही तरी गडबड होऊ शकते. असे स्वातीला वाटले आणि त्यांना बाय करून ती तेथून पटकन निघाली.
स्वातीची भेट झाली,तिच्याशी थोडेसे का होईना बोलता आले.या विचाराने स्वप्नील आनंदी होता.
'मी त्याला विसरण्याचा प्रयत्न करते आहे आणि आज त्याची भेट झाल्याने पुन्हा भावना जागृत होऊ लागल्या.
त्याला पाहून मन तर खूश झाले पण पुन्हा स्वप्न, कर्तव्य यांची आठवण झाली की प्रेम वगैरे हे सर्व नको वाटते.
आयुष्यात असे अनेक प्रसंग येतात,जेव्हा स्वतः चा विचार करावा की इतरांचा? बुद्धिने वागावे की मनाचे ऐकावे? काहीच कळत नाही. अशा वेळी घेतलेला निर्णय खूप महत्त्वाचा ठरतो. तो निर्णय आयुष्यच बदलून टाकतो ...कधी आपले स्वतः चे तर कधी इतरांचे!
प्रेम मिळविण्यासाठी इतर नात्यांचा त्याग करणारेही असतात आणि नात्यांसाठी,कर्तव्यासाठी प्रेमाचा त्याग करणारेही असतात. प्रत्येकाचेच प्रेम यशस्वी होते असेही नाही.
ज्यांना आपले प्रेमही मिळते आणि नाते,इतर सर्व गोष्टी ही मिळतात. असे व्यक्ती खरंच किती भाग्यवान!
मला तर वाटते..देवाने मनात अशी प्रेमाची भावना तरी निर्माण करू नये किंवा केली तर ते प्रेम यशस्वी होण्यासाठी मदत तरी करावी.
प्रेम की कर्तव्य? या दोघांपैकी एकाची निवड करताना माझ्या मनाला किती त्रास होतो आहे?जर माझ्या मनात स्वप्नीलविषयी प्रेमाची भावना निर्माण झालीच नसती तर आज एवढा मनाला त्रास झालाच नसता ना! आता यावर एकच उपाय स्वप्नीलची व माझी यापुढे कधीही भेट होऊ नये.'
स्वाती मनातल्या मनात हे सर्व ठरवत होती.
क्रमशः
नलिनी बहाळकर

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
काही शंका असल्यास , जरूर कळवा.