"अगं,आरती तुला एक विचारायचे आहे,विचारू का?"
आरतीची मैत्रीण ज्योतीने आरतीला विचारले.
"अगं, विचार ना.. परवानगी काय मागते?" - आरती.
"आपल्या घराजवळच्या दत्तमंदीरात दरवर्षीप्रमाणे यावर्षीही गुरूचरित्राचे पारायण होणार आहे. पारायण करायची माझीही खूप इच्छा आहे. तू पण येते का माझ्या सोबतीला? तुलाही आध्यात्माची आवड आहे म्हणून तुला विचारले." - ज्योती.
"हो करू ना आपण पारायण.आवडते ना मला." - आरती.
आरतीला लहानपणापासून आध्यात्माची आवड होती.घरातील वातावरण आध्यात्मिक होते. आईवडिलांच्या संस्काराचा वारसा मुलांनी घेतला होता.आध्यात्मामुळे आपले आचार,विचार, संस्कार चांगले राहतात. मनात कधीही वाईट विचार येत नाही.घरात नेहमी आनंदी वातावरण राहते. संकटात लढण्याची शक्ती मिळते. जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतो.
अशी शिकवण आरतीला मिळालेली होती.
सासरी आल्यावरही ती आपले माहेरचे संस्कार जपत होती.रोजची कामे करून नित्यपूजा,नामस्मरण करायची. हे सर्व ती मनापासून करायची त्यामुळे तिला खूप आनंद मिळायचा आणि तिचे मनही प्रसन्न राहायचे.
खूप नाही पण संसाराची जबाबदारी सांभाळत जितके काही करता येईल तेवढे ती करत होती. आता ज्योतीने पारायणाचे विचारल्यावर ती आनंदाने हो म्हणाली.
आणि ठरल्याप्रमाणे, घरातील सर्व जबाबदाऱ्या पूर्ण करून तिने व ज्योतीने दत्तमंदीरात गुरूचरित्राचे पारायण व्यवस्थित पूर्ण केले. ज्योतीला तिची इच्छा पूर्ण झाल्याचा आनंद झाला होता आणि आरतीलाही खूप प्रसन्न वाटत होते.
आरतीचा नवरा जयेश दरवर्षी दत्तजयंतीला त्याच्या गावी जायचा. तेथे एक दत्तमंदिर होते आणि त्या मंदिराची स्थापना करणाऱ्या बाबांवर जयेशची खूप श्रद्धा होती. त्यांना तो गुरूस्थानी मानत.दरवर्षीप्रमाणे यावर्षीही तो तिथे जाणार होता आणि आरतीलाही बरोबर नेणार होता.
पारायण विनाविघ्न छान झाल्याचा आनंद आरतीला होता आणि आता दत्तजयंतीउत्सवाला जाण्यास मिळते आहे; त्यामुळे आरतीचा आनंद द्विगुणित झाला होता.
निसर्गरम्य ठिकाणी, सुंदर असे मंदिर आणि आलेल्या सर्व भक्तमंडळींचा उत्साह हे सर्व पाहून आरतीचा खूप छान वाटले.
बाबांचा आशीर्वाद घेऊन
जयेशने बाबांना आनंदाने सांगितले,
"बाबा,आरतीने गुरूचरित्राचे पारायण केले आमच्या घराजवळच्या दत्तमंदिरात. त्यामुळे तिला खूप प्रसन्न वाटते आहे."
जयेशने सांगितलेले ऐकून बाबांना आनंद होईल असे आरतीला वाटले. पण बाबा
म्हणाले,
"तिने येथे पारायण केले असते तर खूप छान झाले असते. इथे केलेल्या पारायणाचा खूप प्रभाव असतो."
हे ऐकून आरतीला मनातून खूप वाईट वाटले आणि बाबांच्या बोलण्याचे आश्चर्यही वाटले.
आपण काही विचारले आणि जर बाबांना व जयेशलाही नाही आवडले,त्यांचे मन दुखावले गेले तर..या विचाराने मनात अनेक प्रश्न, शंका असूनही ती काही बोलली नाही. चेहऱ्यावर आनंदाचे भाव आणून ती इतर भक्तांप्रमाणे उत्सवात सहभागी झाली.
दत्तजयंतीनिमित्त किर्तन होते. किर्तनकार महाराज भक्ती, श्रद्धा याविषयावर बोलत होते.
आरती मनात विचार करत होती.
'मी श्रद्धेने, भक्तिने गुरूचरित्राचे पारायण केले.तेही मंदिरच आणि हे ही मंदिरच मग तरीही बाबांना फरक का जाणवला?
सर्व धर्मात,पंथात हेच सांगितले आहे की, देव एकच आहे. फक्त देवाची सेवा करण्याचे मार्ग वेगवेगळे आहेत. सेवा कोणत्याही मार्गाने केली तरी ती शेवटी एकाच देवापर्यत पोहोचते.
आमचा धर्म श्रेष्ठ, आमचा मार्ग सोपा व चांगला .
असे कोणी म्हणू शकते का?
ज्याला जो मार्ग सोयीस्कर वाटतो,त्यानुसार प्रत्येकजण देवाची सेवा करत असतो.काही लोक भक्तिमार्ग ,काही लोक ज्ञानमार्ग तर काही कर्ममार्गाने देवाची सेवा करत असतात.
देवाची सेवा करत असताना,श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी.
आपल्यावर कोणतेही संकट येऊ नये आणि आलेल्या संकटातून आपली लवकर सुटका व्हावी. असेच प्रत्येकाला वाटत असते.अनेकांना वाटत असते की, आपण देवाची सेवा केली की..आपल्यावर संकटे येत नाही आणि आली तरी देव त्यातून वाचवतो. आणि काहींना वाटते की, आम्ही देवाचे कितीही केले तरी ..आमच्यावर संकटे येतच असतात. खरचं देव आहे की नाही? असे त्यांना वाटू लागते.
जन्ममृत्यू,सुखदुःख हे तर सुरूच असते. आपल्या आयुष्यात काही चमत्कार झाला की, देवाला नमस्कार करणारे ही आहेत.
आपल्या आयुष्यात काही चांगले व्हावे यासाठी देवावर श्रद्धा असावीच आणि त्याबरोबर आपल्या स्वतः वर, आपल्या कर्मावरही श्रद्धा व विश्वास असावा. देव त्यांनाच मदत करतो, जे स्वतः काहीतरी चांगले करत कर्म असतात,प्रयत्न करत असतात आणि ज्यांच्या मनात शुद्ध भक्ती असते.
जर मनात शुद्ध भाव व श्रद्धा असेल तर देवाच्या अनेक रूपांपैंकी कोणत्याही रूपाची आणि सेवा करण्याच्या अनेक मार्गांपैंकी कोणत्याही मार्गाने देवाची सेवा केली तरी ती देवाजवळ पोहोचते.मग कोणी असे म्हटले की, "आम्ही सांगितल्याप्रमाणे करा तरच तुमचे चांगले होईल ,लवकर
फळ मिळेल." हे कितपत योग्य ठरते?
आरतीच्या मनात असे विचार, प्रश्न,शंका येत होते.
अनेक भक्तगण बाबांना भेटत होते. आपली सुखदुःख सांगत होते. बाबा प्रत्येकाला दुःख निवारण करण्याचा मार्ग सांगत होते. आणि शेवटी सर्वांना सांगत होते 'पण हे सर्व करण्यासाठी अगोदर मनात खरी भक्ती व श्रद्धा असावी.'
हे ऐकून आरती मनात म्हणाली, देवाला खरी भक्ती आणि श्रद्धा हेच आवडत असते.
समाप्त
नलिनी बहाळकर

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
काही शंका असल्यास , जरूर कळवा.