मराठी कथा, लेख

बुधवार, २० डिसेंबर, २०२३

ऋण



"काय रे विनय, काय झाले? 2,3 दिवसापासून बघतो आहे. शांत शांत राहतो आहे. काही प्रॉब्लेम झाला आहे का?"


दीपकने आपल्या छोट्या भावाला,विनयला विचारले.


"काहीच नाही रे दादा, काही प्रॉब्लेम वगैरे नाही झाला. कुठे शांत राहतो मी ? अगोदरसारखा तर राहतो मी." 


दादाच्या प्रश्नाला उत्तर देवून,काहीतरी कामाचे निमित्त सांगून विनय घराबाहेर पडला.


'घरात खरे सांगितले तर सर्वच टेंशनमध्ये येतील. अगोदरच माझ्या वागण्याचा  त्यांना त्रास होतो आणि त्यात अजून हे टेंशन.'


स्वतःशीच असे बोलत तो मित्राच्या घरी गेला.


दीपक व विनय हे मोहनराव व शोभाताईंचे मुलं. मोहनराव एका कापड दुकानात नोकरीला होते. जेव्हा शिक्षण घेण्याचे वय होते;तेव्हा घरातील परिस्थितीमुळे शिक्षण सोडून नोकरी करावी लागली. नोकरी,लग्न,संसार यात शिक्षणाचा कधी विसर पडला ते कळलेच नाही.

पगार काही जास्त नव्हता पण होता त्यात शोभाताई  काटकसरीने संसार करीत होत्या. दीपक व विनय ने शिक्षण घेऊन चांगली नोकरी तरी करावी किंवा एखादा व्यवसाय तरी करावा. अशी मोहनराव व शोभाताईंची इच्छा होती.

दीपकने तर त्यांची इच्छा पूर्ण केली होती.दीपक बी.एस्सी. बी.एड. करून एका शाळेत नोकरीला लागला होता. पण विनयची गाडी अजून मार्गाला लागली नव्हती.दोघे सख्खे भाऊ पण  एकमेकांच्या अगदी विरुद्ध! दीपक शांत,अभ्यासू,सरळमार्गी तर विनय खोडकर, अभ्यासाची आवड नसलेला,नको त्या गोष्टीत भाग घेणारा!

आयुष्य म्हणजे फक्त मौजमजा! या मंत्रानेच तो वागत होता.त्याचे आईवडील, भाऊ त्याला सर्व प्रकाराने समजावून सांगत. त्याच्या चुकीबद्दलही त्याला रागवत.विनयला शिक्षणात रस नव्हता. कसेतरी बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले.घरातल्यांनी खूप आग्रह केला म्हणून कॉलेजला ऍडमिशन घेतले.पण कॉलेजपेक्षा तो मित्रांच्या टोळक्यात जास्त असायचा. लवकर श्रीमंत कसे होता येईल?विना कष्ट मोठे कसे होऊ शकतो? यावर तो मित्रांशी चर्चा करायचा. 

असेच एके दिवशी एका मित्राने विनयची एका माणसाशी ओळख करून दिली.त्या माणसाच्या गोड बोलण्यावर विनय एवढा खूश झाला की,त्या माणसाबरोबर त्याने काम करायचे ठरवले.

त्या माणसाची एक फायनान्स कंपनी होती, जी गरजू लोकांना कमी व्याजदरात(rate of interest) कर्ज(loan)द्यायची. 

त्या माणसाने विनयला सांगितले की, 


"सुरूवातीला आपण या कंपनीत पैसे गुंतवायचे(invest)आणि हळूहळू  कंपनीचा व्यवहार वाढत गेला की, आपल्याला आपली रक्कम(capital) मिळेलच पण होणारा नफाही(profit) मिळेल."


मगं काय विनयला तर वाटले आपले नशीबच खुलले..

 गुंतवणूक(investment) करण्यासाठी घरात पैसा मागू शकत नव्हता. घरातल्यांना पैसे कमवून एकदम सरप्राईज देवू , असे त्याने ठरवले.


आपल्या जवळच्या एकदोन मित्रांकडून उसनवार पैसे घेतले. थोड्याच दिवसात परत करतो, असे सांगितले.


त्या माणसाने सांगितले तसे विनयने त्याच्या कंपनीत पैसे गुंतवले. त्या माणसाने  त्याला काही कागदपत्रे दाखवले ज्यात किती लोकांना,,कसे कर्ज दिले. कंपनीचा लोकांना कसा फायदा होतो आहे.आपलाही कसा फायदा होतो आहे.हे पटवून दिले. 

विनयही उत्साहात कामाला लागला. भविष्याची स्वप्ने पाहू लागला.

रोज त्या कंपनीच्या ऑफिसात यायचा.कंपनीच्या नावाचा बोर्ड पाहून लोकही कर्जासाठी चौकशीला येत होती.काही जण कर्ज घेत होते  तर काही फक्त चौकशी करून जात होते.


असेच एके दिवशी नेहमीप्रमाणे विनय त्या ऑफिसमध्ये आला तर , तिथे कुलूप लावलेले आणि त्या माणसाला फोन केला तर , फोन बंद ..ऑफिस म्हणजे एक छोट शॉप होत. आजूबाजूला चौकशी करून शॉपच्या मालकाचा फोन नंबर घेतला तर त्याने सांगितले की, 


त्या माणसाने फक्त एका महिन्यासाठी ते शॉप वापरण्यासाठी मागितले होते. बोलण्यावरून चांगला वाटला म्हणून विश्वास ठेवून काही कागदपत्रे न बनवता वापरायला दिले होते."


मालकाने सांगतलेले ऐकून तर विनयची पायाखालची जमीनच सरकली.

आपली खूप मोठी फसवणूक झाली आहे. त्याच्या लक्षात आले.मालकाच्या परवानगीने त्याने कुलूप तोडून आत पाहिले तर काहीच नव्हते. ना काही कागदपत्रे ना काही पुरावे. आता पोलिसात तक्रार केली तर ते आपल्यालाच खूप प्रश्न विचारतील.

आपण तर लवकर श्रीमंत होण्याच्या प्रयत्नात,मित्रांकडून पैसे घेऊन कर्जबाजारी झालो. 

घरातल्यांना आता काय सांगावे,पुढे काय करावे? याच चिंतेत तो असायचा. मित्रांशी या विषयावर बोलून त्याने पैसे परत करण्याची सवलत मागून घेतली. पण तेही किती दिवस आपल्याकडे पैसे ठेवतील ..कधी ना कधी तर मागतीलच ना? झाल्या गोष्टीवर विनय खूप विचार करायचा.


दादाने विचारल्यावर त्याने कारण सांगितले नाही. पण दादानेही त्याच्या मित्रांकरवी सर्व माहिती काढली. त्याच्याशी बोलण्याअगोदर आईबाबांशी बोलला.


'विनयकडून तर खूप मोठी चूक झाली आहे. आता त्याला आपणच मदत करायला हवी.आणि त्याबाबतीत आपण त्याच्याशी शांतपणे बोलू या.' 

असा निर्णय विनयच्या आईबाबांनी व भावाने घेतला.


विनय घरी आल्यावर लगेच कोणी काही बोलले नाही.

जेवण वगैरे झाल्यावर मग दादाने इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर, विनयशी बोलू लागला,


"विनय, तू जरी आम्हांला काही सांगितले नाही तरी आम्हांला सर्व कळाले आहे. आम्ही तुला अनेकदा समजावून सांगितले की,असे पटकन श्रीमंत नाही होता येत. कष्ट कर ,मेहनत कर . शिक्षण पूर्ण कर ,नोकरी कर किंवा काही तरी चांगला व्यवसाय कर.जीवन मौजमजा करण्यासाठी आहे पण जीवनात काम करणेही गरजेचे आहेच ना! आता जे झाले ते पुन्हा झालेले चालणार नाही. तुला शेवटची संधी देत आहोत. तुझ्या मित्रांचे पैसे मी व बाबा आम्ही दोघ मिळून देवून देतो.पण हे कर्ज समज आणि व्याज म्हणून तू  चांगले शिक्षण कर ..नोकरी,व्यवसाय कर आणि आम्हांला आनंद दे. आणि कर्जाची रक्कम परत कर ..कारण तुला आपल्या चुकेची जाणीव झाली पाहिजे.

फुकट मिळालेल्या गोष्टीची किंमत नसते. मेहनत करून जेव्हा एखादी गोष्ट मिळवतो,तेव्हा तिचे महत्त्व कळते."


दादाचे बोलणे ऐकून विनयला आपल्या वागण्याचा रागही येत होता आणि मनातले ओझे कमी झाल्यासारखेही वाटत होते.


"आई-बाबा,दादा माझी खरचं खूप मोठी चूक झाली. मी लवकर पैसे मिळविण्याच्या प्रयत्नात असा कोणावरही विश्वास ठेवायला नको होता. यापुढे मी कॉलेज करून पार्ट टाइम जॉब करून तुमचे पैसे परत करतो." 

विनय असे बोलल्यावर सर्वांना आनंद झाला.


आणि बोलल्याप्रमाणे विनय कॉलेज करता करता एका किराणा दुकानात काम करू लागला.आणि ठरल्याप्रमाणे तो घरातल्यांना पैसे देवू लागला. कॉलेजचे शिक्षण पूर्ण होत आले होते आणि इकडे  दुकानदाराने काही कारणास्तव दुकान विक्रीसाठी काढले होते. आताही विनयला घरातल्यांनी मदत केली. दुकान व्यवस्थित चालत असल्याने विनयने लवकरच घरातल्यांना पैसे परत केले आणि एकदोन वर्षातच त्या दुकानाचे एका सुपर शॉपी मध्ये रूपांतर केले. एक  चांगला व्यावसायिक होऊन, आपण आईवडीलांची इच्छा पूर्ण केली याचा विनयला अतिशय आनंद झाला.

त्याची प्रगती पाहून, आईवडील व भावाला देखील  आनंद झाला आणि आपण दिलेल्या कर्जाचे व्याज व परतफेड खूप  छान झाली याचे समाधान वाटले.


विनयला वाटले, आपण तर पैशाच्या  कर्जाची, पैसे देऊन 

परतफेड केली.पण जन्मापासून  आईबाबांनी  आणि दादाने आपल्यासाठी खूप काही केले, आपल्या चुका पदरात घेतल्या, मोठ्या संकटातून वाचवले, आपल्यावर विश्वास ठेवला तेव्हाच तर आपण हे सर्व करू शकलो. त्यांचे हे ऋण तर मी कधीही फेडू शकणार नाही. मी त्यांचा सदैव ऋणी राहीन.


समाप्त

नलिनी बहाळकर 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काही शंका असल्यास , जरूर कळवा.

कृष्णप्रेम

 1) कान्हाच्या सावळ्या,सुंदर, मोहक मुखावर छान असे हास्य खुलते त्याच्या हास्यात एक वेगळीच जादू असते जी सर्वांना त्याच्या प्रेमाची भुरळ पाडते...