"अरे सुभाष , माझे ऐकले असते तर..आज ही तिसरी मुलगी झाली नसती. तुला सांगत होते... तपासणी करून घेऊ मुलगी असल्याचे कळले असते तर , गर्भ वाढू दिलाच नसता. एक नाही तर तीन मुली ...कसे करशील तू पुढे?मुली लग्न करून सासरी चालल्या जातात. त्यांना कितीही शिकवा ..त्या काय आपल्या थोडीच राहतात? लग्न करून त्यांच्या सासरच्या च होतात. मुलगा आईवडिलांना आयुष्यभर सांभाळतो. आता सतिशला बघं.. त्याला दोन मुले व एक मुलगी आहे. त्याचे मला आहे का काही टेंशन? हे सर्व मी माझ्यासाठी नाही बोलत. मला तुझी काळजी वाटते म्हणून तर बोलते आहे ना?यावेळी तरी मुलगा झाला असता ..म्हणजे काळजी नसती."
सुभाषची आई दुःखी होऊन त्याच्याशी बोलत होती.
"आई, मला वाटले होते ..यावेळी तरी मुलगी होईल. या आशेवरच मी होतो.म्हणून तर तपासणी वगैरे या भानगडीत पडलो नाही. पण देवाने माझे काही ऐकले नाही. आताही माझी निराशाच केली.तुझे ऐकले असते तर बरे झाले असते..असे आता वाटू लागले आहे."
सुभाषही आपल्या आईच्या दुःखी स्वरात आपला दुःखी स्वर मिसळून बोलत होता.
आपल्याला आताही मुलगीच झाली. याचे रमालाही वाईट वाटत होते.
'पहिल्या दोन मुलीच झाल्या. तेव्हाच मी वंशाचा दिवा दिला नाही म्हणून घरात माझा शारीरिक, मानसिक छळ सुरू होता.माझा तर छळ होत होताच पण माझ्या मुलींनाही कधी त्यांच्या वाटेचे प्रेम मिळाले नाही, चांगली वागणूक मिळाली नाही. घरातील बाकीचे सोडा पण स्वतः जन्मदेत्या बापानेही कधी मायेने जवळ घेतले नाही. मुली म्हणून जन्माला आल्या म्हणून माझ्या मुलींनी जणू खूप मोठा अपराधच केला होता.मुलगा झाला नाही म्हणून माझ्यावर होणाऱ्या छळाचा परिणाम मला असह्य होऊ लागला की, मलाही माझ्या मुलींचा राग यायचा. माझ्या पोटी का जन्माला आल्या? असे वाटू लागायचे.पण त्यांना या जगात आणणारी..त्यांना जन्म देणारी ..मी , त्या मुलींची आई आहे ..हे विसरू शकत नव्हते. जर मी मुलाची आई झाले असते तर... घरात किती आनंद राहिला असता, किती कौतुक झाले असते.. माझे व माझ्या मुलाचेही! पण ...तो क्षण कदाचित माझ्या नशिबात नसावा.. म्हणूनच यावेळीही मला देवाने मुलगीच दिली.'
रमा या दुःखी विचाराने आपल्या नशिबाला दोष देत होती.
क्रमशः
नलिनी बहाळकर

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
काही शंका असल्यास , जरूर कळवा.