मराठी कथा, लेख

शनिवार, २० एप्रिल, २०२४

चूक कोणाची? अंतिम भाग


सचिन पूर्णपणे बरा झाल्यावर त्याला घरी सोडले.तो त्याच्या कामात रूळू लागला. मित्रांबरोबर गप्पागोष्टी करू लागला.त्यांच्या बरोबर फिरू लागला.जेव्हा सर्व नॉर्मल झाले. असे मंगलला वाटले तेव्हा ती त्याला त्याने केलेल्या आत्महत्येच्या प्रयत्नाविषयी बोलणार होती; पण त्याअगोदरच तो तिच्याशी बोलला.


"आई,  तुमची सर्वांची पण इच्छा होती की, सायलीचे व माझे लग्न व्हावे. तुझे आणि तिचेही छान पटायचे ना? आणि  सायलीवर मी  मनापासून प्रेम केले. ती आपली नाही ..आता दुसऱ्या कोणाची पत्नी झाली आहे. हा विचार माझे मन मान्य करतच नव्हते. वरवर जरी मी आनंदी राहण्याचा प्रयत्न करत होतो; पण मन तिचाच विचार करत होते. तिच्या सोबतच्या आठवणी आठवायच्या. तिला विसरणे शक्यच नव्हते. तिच्या आठवणी जितका विसरण्याचा प्रयत्न करायचो तितका जास्त त्रास व्हायचा.मला माझ्या स्वतः चा राग यायला लागला होता. माझ्यात काय कमी होते..म्हणून सायलीने मला नाकारले?हा प्रश्न मला त्रास देत होता. माझ्या प्रेमाचा शत्रू कोण? 

सायली..जिला माझे प्रेम कळलेच नाही.

मी ..जो सायलीच्या योग्यतेचा नव्हता .

की 

माझे नशीब ?

या विचारांनी 

मला जगणे असह्य वाटू लागले आणि म्हणून मी माझे जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. पण देवाची कृपा,डॉक्टरांचे प्रयत्न  आणि तुमच्या सर्वांची धडपड यामुळे मी मोठ्या संकटातून वाचलो.माझ्यामुळे तुम्हांला सर्वांना झालेला त्रास पाहिला आणि मला वाईट वाटले  आणि हॉस्पिटलमध्ये मी जे पेशंट पाहिले ...जे वेगवेगळ्या आजारांनी त्रस्त होते,दुःखी होते  पण तरीही जगण्यासाठी धडपड करत होते. त्यांची  जगण्यासाठीची धडपड व डॉक्टरांचे त्यांना बरे करण्याचे  प्रयत्न . हे सर्व पाहिले 

आणि मग माझ्या मनात विचार आला ..'या सर्वांच्या दुःखापेक्षा आपले दुःख तर काहीच नाही. मग आपण तरीही जीवनाला कंटाळलो.' मग ठरवले ..आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो,ती व्यक्ती सुखात असणे महत्त्वाचे!  सायली तिच्या घरी सुखात आहे, हे माझ्या साठी खूप झाले.तिच्याशी माझे लग्न झाले नाही.हा माझा नशिबाचा भाग,असे समजले.जे आपल्या नशिबात नाही त्याचा विचार करण्यापेक्षा जे आपल्या हातात आहे त्याचा विचार करण्याचे ठरवले.

आता मी माझ्या व्यवसायात लक्ष देईन आणि तुला,ताईला सुखी ठेवण्याचा प्रयत्न करेल."


सचिनने सांगितलेले ऐकून मंगलला खूपच आनंद झाला आणि तिने देवाचे खूप खूप आभार मानले.


एका वर्षांनी सचिनचे एका चांगल्या मुलीबरोबर लग्न झाले  आणि तोही आपल्या संसारात रमला.आपल्या मुलाचा सुखी संसार पाहून मंगललाही समाधान वाटले.


समाप्त

नलिनी बहाळकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काही शंका असल्यास , जरूर कळवा.

कृष्णप्रेम

 1) कान्हाच्या सावळ्या,सुंदर, मोहक मुखावर छान असे हास्य खुलते त्याच्या हास्यात एक वेगळीच जादू असते जी सर्वांना त्याच्या प्रेमाची भुरळ पाडते...