"अरे, माझ्या सोन्या..अरे माझ्या मोन्या..." असे आजी आपल्या नातवांना मायेने आवाज द्यायची. त्यांना प्रेमाने खाऊपिऊ घालायची. हे सर्व पाहत रमाच्या मुली वाढत होत्या. जाऊबाईने घराण्याला कुलदीपक दिला म्हणून घरात तिचा रूबाब जरा जास्तच होता.आपल्याला तिन्ही मुलीच .. म्हणून सासूबाईंकडून आपल्याला चांगली वागणूक मिळणार नाही. हे रमाला कळत होते.पण आपला नवराही..तसाच!
ज्याने आपल्या बायकोला,आपल्या मुलींना समजून घेऊन ..त्यांच्याशी प्रेमाने वागायचे तर तोही आपल्या भावाच्या मुलांवरच आपल्या प्रेमाचा वर्षाव करायचा. तिन्ही बाळंतपणाच्या वेळी रमाला झालेला त्रास आणि तिची सध्याची शारीरिक व मानसिक परिस्थिती पाहून डॉक्टरांनी 'आता काही रिस्क घेऊ नका.' असे सांगितले होते. त्यामुळे सुभाष अजून चिडचिडा झाला होता.
यापुढे मी माझ्या तिन्ही मुलींची आई म्हणूनच राहणार आहे.असे रमाने ठरवल्याने तिनेही पुन्हा आई होण्याचा विचार मनातून कधीच काढून टाकला होता.घरात आपल्याला, आपल्या मुलींना होणारा त्रास,मिळणारी वागणूक हे सर्व ती सहन करत होती. फक्त आपल्या मुलींची आई म्हणून जगत होती.
तिन्ही मुली देवून देवाने आपल्यावर अन्याय केला. असे रमाला वाटत होते;पण आपल्या तिन्ही मुली दिसायलाही गोड आणि दिसण्याबरोबर त्यांना लाभलेली कुशाग्र बुद्धिमत्ता. यामुळे रमा देवाचे मनापासून आभार मानत होती.आपल्या मुलींचे हसणे,बोलणे,वागणे पाहून रमा सर्व दुःख विसरून जायची. तिला अजून संकटाशी लढण्याची ताकत मिळायची. उत्साह मिळायचा.
घरात आजी-आजोबा, आई-वडील आणि काका या सर्वांचे जास्तीचे प्रेम मिळत गेल्याने साहजिकच सतिशचे मुले जास्तच लाडावली.दिवसेंदिवस हट्टी होऊ लागली. आणि अभ्यासातही मागे पडू लागली.याउलट मुळातच हुशार असलेल्या रमाच्या मुलींना अभ्यासाची आवड तर होती पण रमाने केलेल्या चांगल्या संस्कांरामुळे अभ्यासात प्रगती करत होत्या आणि त्यांना यशही मिळत होते.
सतिशचे मुले नापास होत आणि रमाच्या मुली जेव्हा चांगल्या गुणांनी पास होत. तेव्हा आजी त्यांचे कौतुक तर करायची नाही उलट अजून म्हणायची,
"मुली कितीही हुशार असल्या,कितीही शिकल्या तरी लग्न करून सासरीच जाणार आणि संसारच करणार आहेत."
रमाला तर आता हे सर्व ऐकायची सवय झाली होती त्यामुळे 'दुर्लक्षणाय नमः' असे म्हणत ती आपल्या कामात लक्ष द्यायची.
सुरूवातीला आपल्या मुलींचा राग करणारा सुभाष, आपल्या मुलींचे गुण पाहून आणि त्या आपल्यावर करत असलेले प्रेम पाहून ...त्यांच्याशी प्रेमाने वागू लागला.
क्रमशः
नलिनी बहाळकर

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
काही शंका असल्यास , जरूर कळवा.