आजपर्यंत आपण आईचे ऐकून रमावर,आपल्या मुलींवर खूप अन्याय केला. याचे सुभाषला वाईट वाटू लागले.आता त्याची आई जेव्हा रमाला व मुलींना वाईटबरे बोलायची; तेव्हा सुभाष आईला शांत राहण्याविषयी बोलायचा. रमाची बाजू घेऊन बोलायचा.
हे सर्व पाहून त्याच्या आईला वाटायचे,
'आजपर्यंत आपण सांगितलेले ऐकणारा,आपल्या शब्दाबाहेर न जाणारा .आपला सुभाष,आज त्याच्या बायकोसाठी, मुलींसाठी आपल्याला उलट बोलत आहे.'
या गोष्टीचा राग येऊन तिने सुभाषला त्याच्या बायकोमुलींसह घरातून हाकलून दिले.
सुभाष व रमा ने भाड्याच्या घरात आपला संसार थाटला. सुभाषला नोकरी होतीच पण त्याने आपल्या वाटणीची शेती आईवडिलांकडून मागून घेतली.शेती व नोकरी करत आपल्या मुलींना तो वाढवू लागला. रमाही आपला संसार छानपणे सांभाळत होती. आपल्या मुलींच्या सुखाची स्वप्ने पाहत होती.
आपले आईवडील आपल्यासाठी कष्ट करत आहे. याची मुलींना जाणीव होती. त्यांचेही आपल्या आईवडिलांवर खूप प्रेम होते.
रमा व सुभाष यांच्या प्रयत्नांमुळे त्यांच्या तिन्ही मुली चांगले शिक्षण घेऊ लागल्या. मोठी मुलगी नोकरीलाही लागली. लहाण्या दोन्हींचेही लवकरच शिक्षण पूर्ण होणार होते. आपल्या मुलींचे गावातील लोकांकडून होणारे कौतुक ऐकून रमाला तर आनंद होत होताच पण सुभाषलाही आनंद होत होता.दोघांचाही आनंदाने, अभिमानाने ऊर भरून येत होता.
मोठ्या मुलीसाठी घरबसल्या चांगले स्थळ आले होते. सर्व बाजूंनी चौकशी करूनच रमा व सुभाषने आलेल्या स्थळाला होकार दिला होता.
सासरची लोकही चांगली मिळाली. त्यामुळे रमाला व सुभाषला आनंदच झाला होता. 'दोन्ही मुलींनाही असेच चांगले स्थळ मिळू दे.' असे ते देवाला प्रार्थना करत होते.
लग्नानंतर आपल्या मुलींना काही त्रास नको. आपण फुलाप्रमाणे वाढवलेल्या आपल्या मुलींना दुःखाचे काटे टुचू नये. माहेरी जशा आनंदात होत्या तशाच आनंदी राहो. असेच प्रत्येक आईवडिलांना वाटत असते.
असेच रमाला व सुभाषला वाटत होते.
आपणही आपले माहेर सोडून सासरी आलेलो असतो. आपल्याला सासरी झालेला त्रास हा आपल्या मुलीला मिळू नये .
असे प्रत्येक मुलीच्या आईला वाटत असते.ती आपल्या मुलीच्या सुखासाठी देवाला प्रार्थना करत असते.
मुलीला चांगले सासर मिळाल्याचा आनंद तर होताच पण आपली मुलगी आता दुसऱ्याची अमानत झाली आहे. याचेही रमा व सुभाषला दुःख वाटत होते. एका डोळ्यात सुखाचे तर दुसऱ्या डोळ्यात दुःखाचे अश्रू होते.
एकदोन वर्षांच्या अंतराने दोन्ही मुलींचेही लग्न झाले. आपल्या मुलींचे सुखी संसार पाहून रमा व सुभाषला खूप समाधान वाटत होते. आणि आता तर ते आजी आजोबाही होणार होते.
"मला माझ्या पणतीला पाहू दया " असे म्हणत जेव्हा रमाच्या सासूबाई हॉस्पिटलमध्ये आल्या आणि जेव्हा त्यांनी बाळाला आपल्या मांडीवर घेतले तेव्हा रमाला व सुभाषला खूप आनंद झाला.
'तीन मुलींची आई झाली म्हणून मी त्रास सहन केला पण माझ्या मुलींमुळे मला आनंदाचे क्षणही मिळाले आणि मला त्यांचा नेहमी अभिमानही वाटला.आज माझ्या मुलीने मुलीला जन्म दिला आणि तीही एका मुलीची आई झाली. याचा आम्हा सर्वांना आनंदच झाला.'
या विचाराने रमाच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू आले होते.
समाप्त
नलिनी बहाळकर
सदर कथा त्या काळाला किंवा विचारांना धरून लिहीले आहे, जेव्हा मुलांना मुलींपेक्षा जास्त महत्त्वाचे समजले जायचे. मुली म्हणजे हुंडा..मुली म्हणजे जबाबदारी .या विचाराने बघितले जायचे.
पण आता काळानुसार परिस्थिती व लोकांचे विचार ही बदलत आहेत . मुलगा व मुलगी हा भेदभाव पालक आता करत नाही. मुलगीच झाली म्हणून दुःखी न होता, मुलगी जन्माला आली याचा सोहळा साजरा करण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
काही शंका असल्यास , जरूर कळवा.