मराठी कथा, लेख

Breaking

गुरुवार, १५ जानेवारी, २०२६

लग्नगाठ भाग 34

 'विनयबरोबर लग्न होणे. हा आपल्यासाठीच एक मोठा आश्चर्याचा धक्का होता.


 अभ्यासासाठी सुट्ट्या होत्या म्हणून मी हॉस्टेलवरून घरी आली होती.  विनयबरोबर माझे लग्न व्हावे. असा घरात विषय सुरू होता. सर्व बाजूंनी विचार करून मी पण लग्नाला तयार झाली. सर्व काही एवढ्या घाईत झाले की,  लग्नासाठी माझ्या मैत्रिणींनाही मी बोलवू शकले नाही. आणि माझे लग्न झाले हे आता जेव्हा त्यांना कळेल, तेव्हा  त्यांना नक्की माझा राग येईल.  त्या खूप सारे प्रश्न विचारून मला त्रास देतील. त्यांना लग्नाचे खरे कारण सांगितले तर स्मिताची बदनामी होईल.  काही झाले तरी स्मिता आपली बहिण व एक चांगली मैत्रीण आहे. त्यामुळे मी खरे कारण नाही सांगू शकणार.


 मंगळसूत्र व जोडवी कोणाला दिसणार नाही. याची मी काळजी घेईन म्हणजे माझे लग्न झाले आहे. हे कोणाला कळणारच नाही.  आता परीक्षेचा काळ आहे, त्यामुळे सर्वजण अभ्यासात व्यस्त आहेत.  परीक्षा संपली की सुट्टी लागेल. त्यामुळे काही प्रश्नच राहणार नाही.

 पण तोपर्यंत तरी काळजी घ्यायला हवी.'



 हॉस्टेलला आल्यावर विद्या असा विचार करत होती.

 "अगं विद्या, तुला काही कळलं का?"

 विद्याची मैत्रीण मीनल विद्याला म्हणाली.

"कशाबद्दल गं?"

 विद्या प्रश्न विचारत म्हणाली.

"अगं,  ती आपली मैत्रीण सविता पाटील आहे ना, तिचे लग्न झाले."

 मीनल म्हणाली.

"झाले असेल मग त्यात काय वेगळं?"

 विद्या शांतपणे मीनलला म्हणाली.

 "तुला ही बातमी ऐकून आश्चर्य किंवा काही वेगळे नाही वाटले? तू एवढी शांत कशी?"

मीनलने विद्याला विचारले.

 "काही नाही वेगळे वाटले." 

 विद्या म्हणाली.

"मग पुढे ऐक आता. सविताने आपल्या घरातल्यांना न सांगता आपल्या प्रियकरासोबत रजिस्टर लग्न केले.  तो शाळेत होता तिच्यारोबर. तेव्हापासून त्यांची मैत्री व प्रेम आहे.  हॉस्टेलला आता तिचे हे शेवटचे वर्ष होते. कदाचित घरी गेल्यावर तिच्या आई-बाबांनी तिच्यासाठी स्थळ शोधायला सुरुवात केली असती, म्हणून तिने लग्न करण्याचा निर्णय घेतला. परीक्षा संपली की ते दोघे आपापल्या घरी सांगणारच आहेत. 

 घरात जर त्यांच्या लग्नाला विरोध झाला तर पुढची सोय त्यांनी केली आहे.

 सविता आपल्याशी किती छान गप्पा मारते?  ती आपली खूप चांगली मैत्रीण आहे.  पण तिने आपल्याला तिच्या प्रेमप्रकरणाबद्दल कधी सांगितले नाही. आणि तिचे असे काही असेल? असे आपल्याला जाणवू पण दिले नाही. लग्नाचे पण तिने स्वतः नाही सांगितले. तिच्या गळ्यात मी मंगळसूत्र पाहिले, तेव्हा मी तिला विचारले.

तिला सर्व सांगण्यासाठी आग्रह केला, तेव्हा तिने सर्व सांगितले.

 कशा असतात ना मैत्रिणी?  एकीकडे खूप मैत्री आहे. असे दाखवतात आणि दुसरीकडे  मनातले काही कळू सुद्धा देत नाही. प्रेम, लग्न या गोष्टी लपवून ठेवतात. मला अशा मुलीही आवडत नाही आणि अशी मैत्रीही आवडत नाही."


मीनल थोड्या नाराजीच्या स्वरात म्हणाली.

 "अगं मीनल, सविताने आपल्याला तिच्या प्रेमाबद्दल व लग्नाबद्दल काही सांगितले नाही. म्हणून तू नाराज आहेस.  तिचा तुला राग आला आहे. पण  तिचाही काही प्रॉब्लेम असेल  म्हणून तिने आपल्याला सांगितले नसेल.  आपण तिच्या मैत्रिणी आहोत. आपण तिला समजून घ्यायला हवे. 

प्रत्येकाच्या आयुष्यात असे काही प्रॉब्लेम असतात, जे इतरांना नाही सांगू शकत.  तू आता हा सर्व विषय  मनातून काढून टाक आणि अभ्यासात लक्ष दे बरं."

 विद्याने  मीनलला समजावून सांगितले.


'सविताच्या वागण्याचा मीनलला इतका राग आला आणि माझे लग्न झाले आहे. हे जर मीनलला कळले तर तिला माझाही राग येईल ना?  बघू जेव्हा अशी वेळ येईल, तेव्हा सांगू काहीतरी. 


स्मिताप्रमाणे सवितानेही स्वतःच्याच मनाचा विचार केला. प्रेमासाठी आई-बाबांना सोडून जाणे कसे जमते या मुलींना?  एक प्रेम मिळवण्यासाठी दुसऱ्या प्रेमाला सोडावे लागते. 

आपले प्रेम मिळाल्यावर स्मिता व सवितासारख्या मुली जीवनात खरंच आनंदी राहत असतील का?


 विनयला पाहताच मी पण त्याच्या प्रेमात पडले होते. मग प्रेमासाठी मी पण आई बाबांना सोडून गेली असती का? 


 ज्यांना आपले प्रेमही मिळते व आई-बाबांनाही सोडावे लागत नाही, ते खरंच किती भाग्यवान ना!  


आणि अशाही अनेक प्रेमकथा  होत असतात, जिथे कुठेतरी त्याग, दुःख,त्रास, विरह वगैरे  असते. 


 काही प्रेमकथा यशस्वी होतात तर काही अपूर्णच राहतात. 

लग्न होऊन नशिबाने माझे प्रेम मला मिळाले. पण आता पुढचा प्रवास कसा होईल? विनय माझ्याशी कसा वागेल?  हे सर्व आता येणारा काळच ठरवेल. आता फक्त अभ्यास महत्त्वाचा आहे.'

 प्रेमाबद्दल एवढा विचार करणाऱ्या मनाला विद्याने पुन्हा अभ्यासात गुंतवले.


"विद्या, तुला एक सांगायचे आहे. पंधरा-वीस दिवसांपूर्वी कॉलेज कॅम्पसमध्ये एक मुलगा तुझ्याबद्दल चौकशी करत होता.  मला वाटले काही काम असेल त्याचे आणि मी पण खूप घाईत होतो, त्यामुळे त्याकडे जास्त लक्ष दिले नाही. आता माझ्या मित्रांकडून कळते आहे की, तो मुलगा तुझी खूप चौकशी करत होता. तुझ्याबद्दल त्याला काहीतरी जाणून घ्यायचे होते.  तुला काही समजले का कोण होता तो? आणि का चौकशी करत होता एवढी?"

 विद्याच्या वर्गातील दीपक विद्याला म्हणाला.


 "नाही रे, मला नाही असे कोणी भेटले आणि मला कोणी याबद्दल सांगितले ही नाही. पुन्हा जर तो मुलगा भेटला तर विचार त्याला."

 विद्या दीपकला म्हणाली.

 "ठीक आहे. तो पुन्हा भेटला तर विचारतो त्याला. पण तू काळजी घे." 

असे बोलून दीपक त्याच्या मित्रांसोबत कॅन्टीनमध्ये गेला.


क्रमश:

नलिनी बहाळकर 








कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काही शंका असल्यास , जरूर कळवा.

धार्मिक अधर्मी

 "किती अभद्र विचार आहेत गं या माणसाचे!"   पल्लवी आपल्या मैत्रिणीला अनिताला म्हणाली.   "आता गाडी घेऊन गेला तोच ना?"  अनित...