मराठी कथा, लेख

शनिवार, २८ फेब्रुवारी, २०२६

दुतोंडी वागणूक भाग 2


 "काय  गं आई, दोन-दोन सुना घरात असून तू का काम करतेस? आता आराम करायचे दिवस आहेत  तुझे.  अजून किती दिवस काम करशील? आयुष्यभर केले ना तू काम."


निर्मलाताईंचा मोठा मुलगा अजय  निर्मलाताईंना काळजीने म्हणाला.


 तो बाहेरून घरात आला, तेव्हा आई किचनमध्ये चपात्या करत होती.  ते पाहून तो असे म्हणाला.


 "अरे तुझी येण्याची वेळ झाली. तुला गरम चपाती लागते म्हणून करते आहे. प्रतीक्षा बाळाला घेऊन बसली आहे व लहानीला अजून कामाचे पटकन जमत नाही. खूप हळूहळू काम करत असते. आईलाच मुलाची काळजी असते ना! म्हणून करतेय."


 निर्मलाताईंनी मुलाला असे सांगितले.


 त्या जेव्हा हे अजयला सांगत होत्या, तेव्हा हे सर्व लहान सुनेने वर्षाने ऐकले.



ती बाहेरून मागच्या दाराने किचनमध्ये येत होती, तेव्हा तिने हे ऐकले.

 हे ऐकून तिला सासूबाईंचा राग आला कारण प्रतीक्षा वहिनींनी सर्व स्वयंपाक केला होता. अजय भाऊजी आल्यावर गरम चपातीही करणार होत्या;  पण सासूबाई त्यांना म्हणाल्या की,

 'तू बाळाला जेवण भरव. मी  करते चपात्या.'


तरी वहिनी त्यांना नको म्हणत होत्या. 

 'मी करते किंवा वर्षा करेल.' असे म्हणाल्याही होत्या; पण सासूबाईंनी ऐकलेच नाही.त्या स्वतःहून चपात्या करायला लागल्या आणि मला पण बाजूच्या मावशींकडे भाजी द्यायला मुद्दाम पाठवून दिले म्हणजे मुलाला समजेल की आपली आईच काम करते. दोन्ही सुना आईकडून काम करून घेतात.


 वर्षाला खरा प्रकार अजय भाऊजींना सांगून टाकावा.  असे वाटले, पण  'आपण घरात नवीनच आहोत. घरात सासुबाईंविषयी त्यांच्या मुलांना असे सांगितले तर मलाच बोलणे बसतील.  जाऊ दे असेही दोन दिवसात मी आणि समीर मुंबईला आपल्या घरी जाणारच आहोत. कशाला घरात वादविवाद करायचेत.' या विचाराने वर्षा शांत बसली.


 निर्मलाताईंना अजय व समीर ही दोन मुले होती.  मोठा मुलगा अजय व सून प्रतीक्षाला दोन वर्षाचा मुलगा होता.  लहान मुलगा समीर याचे काही दिवसांपूर्वीच वर्षाशी लग्न झाले होते. समीर मुंबईला नोकरी करत होता त्यामुळे समीर व वर्षा मुंबईला जाणार होते. मोठा मुलगा अजय इकडेच  गावी नोकरीला होता. निर्मलाताईंच्या मिस्टरांचे पाच वर्षांपूर्वी  हार्ट अटॅकने   निधन झाले होते.  निर्मलाताईंचे आपल्या दोन्ही मुलांवर खूप प्रेम होते. मुलांचेही आपल्या आईवर जीवापाड प्रेम होते. ते आईची खूप काळजी घेत होते.  सर्व काही छान होते; पण नवीनच लग्न करून आलेल्या वर्षाला निर्मलाताईंच्या वागण्याबोलण्यातून काही गोष्टी कळत होत्या, त्यावरून निर्मलाताईंची दुतोंडी वागणूक तिच्या लक्षात आली होती.  आणि तिला ते आवडत नव्हते.  एकीकडे 'मी खूप चांगली आहे.' असे समोरच्या व्यक्तीला त्या दाखवत होत्या आणि पाठीमागे त्या व्यक्तीला नावेही ठेवत होत्या.



क्रमश:

नलिनी बहाळकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काही शंका असल्यास , जरूर कळवा.

कृष्णप्रेम

 1) कान्हाच्या सावळ्या,सुंदर, मोहक मुखावर छान असे हास्य खुलते त्याच्या हास्यात एक वेगळीच जादू असते जी सर्वांना त्याच्या प्रेमाची भुरळ पाडते...