मराठी कथा, लेख

Breaking

शनिवार, २८ फेब्रुवारी, २०२६

दुतोंडी वागणूक भाग 1

 "वर्षा, छान झाले होते गं पोहे!  तुला स्वयंपाकाचे काही शिकवण्याची, काही सांगायची गरज नाही बाई! तुझ्या जावेला प्रतीक्षाला काही येत नव्हते. तिला सर्व शिकवले मी. अजून पण काही गोष्टी येत नाही तिला."


 निर्मलाताई आपल्या लहान सुनेला वर्षाला तिचे कौतुक करत म्हणाल्या.


 सासूबाई आपले कौतुक करत आहेत.  याचा वर्षाला आनंद झाला होता; पण आपल्याजवळ प्रतीक्षावहिनींविषयी असे का सांगत आहे? याविषयी तिला थोडे आश्चर्य वाटले.


 सासूबाईंचे सर्व बोलणे तिने फक्त ऐकून घेतले, त्यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही.


 'आपले लग्न होऊन चारच दिवस झाले आहेत. सासूबाई माझे कौतुक करत आहे हे ठीक आहे; पण मोठ्या सुनेविषयी माझ्याजवळ असे काय सांगत आहे? माझे कौतुक करत आहे आणि वहिनींचे गाऱ्हाणे माझ्याजवळ सांगत आहे. वहिनींबद्दल काय किंवा घरातील कोणाबद्दल मला अजून काहीच व्यवस्थित माहित नाही. मी त्यांच्या कोणाविषयी माझे मत कसे सांगू शकते? आणि जरी मला  प्रत्येकातील गुणांबरोबर त्यांचे दोषही जरी कळू लागले तरी,मी एकमेकांना थोडीच सांगणार  काही? सासूबाईंच्या अशा वागण्यापासून मला आतापासूनच सावध राहिले पाहिजे.'


 वर्षा असा विचार करतच आपले काम करु लागली.


 "काय विचार करते आहे वर्षा? माहेरची आठवण येते आहे का?"


  विचार करत असलेला वर्षाचा चेहरा पाहत प्रतीक्षाने तिला विचारले.


 "काही नाही हो वहिनी, काही विचार वगैरे नाही करत आहे. बोला ना काय म्हणताय?"


वर्षा प्रतीक्षाला म्हणाली.


 "अगं, तुझा विचार करत असलेला चेहरा पाहिला, म्हणून विचारले. तुला काही सांगायचे असेल तर सांगत जा. संकोच नको करू."


 प्रतीक्षा वर्षाला म्हणाली.


 "हो, नक्की सांगणार वहिनी, तसे काही वाटले तर. 

बरं मी काय म्हणते, आज कोणती भाजी करायची ?"


 वर्षाने वहिनींच्या मनातील शंकेला दूर करण्याचा प्रयत्न केला व विषय बदलवत वहिनींना भाजीविषयी विचारले.


"वर्षा,आज तू मी केलेली मेथीची भाजी खाऊन बघ. तुला खूप आवडेल. आईंना खूप आवडते मी केलेली मेथीची भाजी."


 वहिनी मोठ्या आनंदाने असे सांगत किचनमध्ये गेल्याही. 


 वहिनींनी भाजी काय करायची? याचे उत्तर दिलेच नाही पण त्या स्वतः भाजी करणार आहे. हे त्यांच्या बोलण्यातून वर्षाला कळले.


 'मी कोणता  विचार करत होते? हे जर वहिनींना खरे सांगितले असते तर त्यांना किती वाईट वाटले असते!


 काही वेळेस खरे न सांगण्यातच सर्वांचे भले असते. 

 

असे म्हणतात, ते खरे आहे.


 नाती टिकवायची असतील तर काही गोष्टी न सांगितलेल्याच बऱ्या!


 

एकीकडे आई  प्रतीक्षावहिनींविषयी माझ्याजवळ असे बोलल्या आणि दुसरीकडे वहिनींनी केलेली भाजी पण त्यांना आवडते? 


आईंची कोणती वागणूक खरी आणि कोणती खोटी? काही समजत नाही.'


वर्षा  सासूबाईंच्या दुतोंडी वागणुकीबद्दल असा विचार करू लागली.


क्रमश:

नलिनी बहाळकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काही शंका असल्यास , जरूर कळवा.

धार्मिक अधर्मी

 "किती अभद्र विचार आहेत गं या माणसाचे!"   पल्लवी आपल्या मैत्रिणीला अनिताला म्हणाली.   "आता गाडी घेऊन गेला तोच ना?"  अनित...