"तुझे एकत्र कुटुंब आहे. आणि आमच्यामुळे तुम्हांला नको काही त्रास. आमच्यामुळे तुला कोणी बोलायलाही नको आणि इकडे सर्व व्यवस्थित होते आहे ना? तर मग तिकडे का यायचे? तू फक्त बाबांच्या तब्येतीसाठी देवाकडे प्रार्थना कर. बाकी काही टेन्शन घेऊ नको. जास्त विचार करू नको."
प्रियाच्या भावाने तिला समजावले.
"दादा, मग मी तिकडे येते. तुम्ही इकडे येत नाही तर मी तुझ्या मदतीला तरी येऊ शकते ना?"
प्रियाने आपला निर्णय भावाला सांगितला.
प्रियाने आपला हा निर्णय घरात सर्वांना सांगितला व ती गावी जाण्याची तयारी करू लागली.
'सुंठीवाचून खोकला गेला.'
असेच प्रियाच्या सासूबाईंना वाटत होते. प्रियाच्या भावाने चांगला निर्णय घेतला. या विचाराने सासूबाईंना आनंद होत होता.
आपल्या बाबांच्या ऑपरेशनच्या प्रसंगाने प्रियाला सासूबाईंचा, जाऊबाईंचा व नवऱ्याचा खरा स्वभाव कळला. आपल्या माहेरच्या बाबतीत त्यांना काय वाटते? हेही समजले.
'सासरच्या लोकांना आपल्या घरी येणारी सून ही चांगल्या घरातील व संस्कारी हवी असते. तिच्या माहेरची लोक चांगली हवीत. मुलीच्या सासरी मदत करणे, त्यांच्या सुखदुःखात सहभागी होणे. हे माहेरच्या लोकांचे कर्तव्य असते असे त्यांना वाटते. पण तिच्या माहेरच्या लोकांना संकटकाळी मदत करणे ही आपली जबाबदारी असते. हे ह्या लोकांना कळत नाही.
आपले आई-बाबा असे नाहीत. वहिनींच्या माहेरच्या लोकांना किती आदराने वागवतात! त्यांच्या सुखदुःखात त्यांना मदत करतात. मला माझ्या आई-बाबांचा खरंच खूप अभिमान वाटतो.'
असा विचार करत व
माहेरच्या आठवणीने प्रियाच्या डोळ्यांत पाणी आले.
प्रियाच्या बाबांचे ऑपरेशन व्यवस्थित पार पडले. प्रियाने त्यांची खूप काळजी घेतली. आपण आपल्या बाबांसाठी काहीतरी करू शकलो. याचे समाधान तिला वाटत होते. या समाधानातच ती सासरी आली. शुभम बाबांना बघायला आला होता. यामुळे प्रियाला थोडे बरे वाटले. सासरी आल्यावर घरातील वातावरण तिला अगोदर सारखेच वाटले. प्रियाने कधी तो विषय पुन्हा कधी काढला नाही. काही झालेच नाही असे ती वागत होती. अगोदरसारखे सर्व रूटीन छान सुरळीत सुरू झाले होते.
काही महिन्यांनी,
प्रियाच्या सासूबाई त्यांच्या माहेरच्या नातेवाईकांकडे काही कार्यक्रमासाठी गावी गेल्या होत्या. तिथे त्या पडल्या. त्यांना खूप लागले. गावाहून असा फोन येताच प्रियाने लगेच आपल्या भावाला फोन करून सांगितले. तिच्या भावाने आपली सर्व कामे बाजूला ठेवून अगोदर प्रियाच्या सासूबाईंना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले आणि व्यवस्थित काळजी घेतली. प्रियाचे माहेरचे गाव जवळच होते त्यामुळे तिच्या भावाची सासूबाईंना मदत झाली. प्रिया व शुभम येईपर्यंत त्याने सर्व छान सांभाळले होते. सासूबाई जेवढे दिवस हॉस्पिटलमध्ये होत्या तेवढे दिवस प्रियाच्या माहेराहून डबा येत होता.अशा प्रसंगी प्रियाच्या माहेरची खूप मदत झाली.
आपल्या माहेरच्याविषयी प्रियाचा अभिमान अजून वाढला.
या प्रसंगातून सासूबाईंच्या वागण्यात, विचारात काही सकारात्मक बदल होईल? सुनांच्या माहेरविषयी काही मतपरिवर्तन होईल?
अशी कोणतीही अपेक्षा प्रियाने केली नाही.
'आपण आपली जबाबदारी पार पाडावी.'माहेरी मिळालेल्या या संस्कारांना प्रिया जपणार होती.
समाप्त
नलिनी बहाळकर

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
काही शंका असल्यास , जरूर कळवा.