"आई, तुमचे म्हणणे बरोबर आहे गावाकडे होतात ऑपरेशन्स. पण इथे यांच्या ओळखीने होईल तर मला बरे वाटेल. आपल्या घरात त्यांना काही त्रास होणार नाही याची काळजी घेईन मी. मुलगी म्हणून माझी पण काही जबाबदारी आहे ना?"
प्रिया आपली बाजू मांडत म्हणाली.
"तू एकटीने हा निर्णय घेतला आहेस का? घरात इतरांचे काय म्हणणे आहे ते तर बघ. शुभम काय म्हणाला? तुझ्या या निर्णयामुळे इतरजण जर नाराज झाले तर घरात भांडणाला कारण होईल. घरात शांतता हवी असेल तर तू तुझा निर्णय बदल."
प्रियाच्या निर्णयाला नकार देत सासूबाई म्हणाल्या.
सासूबाईंशी या विषयावर जास्त काही न बोलता प्रिया बेडरूममध्ये चालली गेली. सासूबाईंच्या बोलण्याचा ती विचार करू लागली.
'सासूबाईंच्या बोलण्यातून जाणवले की मी बाबांना येथे आणू नये. म्हणून त्या वेगवेगळे कारणे सांगत आहेत. जेव्हा हे घर घेण्यासाठी पैसे कमी पडत होते तेव्हा माझ्या बाबांनीच पैशांची मदत केली ना! तेव्हा कुठे हे घर झाले. बाबांनी आपल्या मुलीच्या सुखाचा विचार करूनच मदत केली होती ना! आता मुलगी म्हणून मला त्यांच्यासाठी काही करण्याची संधी मिळते आहे तर मी का काही करू नये? लग्नानंतर मुलींनी माहेरची जबाबदारी पार पाडायची नाही का? माहेरच्यांनी मुलीला मदत करावी. तिच्या सुखाचा विचार करावा हे जितके खरे आहे तितकेच मुलीने लग्नानंतर माहेरच्या सुखदुःखात त्यांना मदत करावी हेही तितकेच खरे आहे ना! लग्न करून सासरी आल्यावर ती सासरच्या तिच्या सर्व जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडते. मग तिने माहेरच्यांसाठी कधी काही केले तर त्यात काय चुकीचे? घरातून मला कितीही विरोध झाला तरी मी बाबांना इकडे आणणार.'
प्रिया आपल्या निर्णयावर ठाम होती आणि त्याप्रमाणे ती तयारीलाही लागली.
भावाशी तिचे रोज फोनवर बाबांच्या तब्येतीविषयी बोलणे होत होते.
"प्रिया, माझ्या मित्राच्या ओळखीचे एक चांगले डॉक्टर आहेत. डॉक्टर अनुभवी आहेत आणि यशस्वी पण आहेत. त्यामुळे बाबांचे ऑपरेशन आम्ही इकडेच करणार आहोत. आम्हांलाही इकडे सोयीचे होईल. तू काही टेन्शन घेऊ नकोस आणि वाईटही वाटून घेऊ नकोस. बाबांचे ऑपरेशन चांगले होईल आणि बाबा लवकर बरे होतील."
प्रियाच्या भावाने तिला फोनवर सांगितले.
"पण दादा बाबांना इकडे आणले असते तर बरे झाले असते ना? माझी खूप इच्छा होती."
प्रिया आपल्या भावाला म्हणाली.
क्रमश:
नलिनी बहाळकर

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
काही शंका असल्यास , जरूर कळवा.