"आईच्या स्वभावामुळे मुलाचा संसार टिकला नाही. असेच सर्वजण म्हणत होते."-- पवारताई
"मला तर मनोजबद्दल वाईट वाटत आहे.एवढी चांगली बायको मिळाली होती;पण गेली सोडून त्याला."-- राणेताई
"आता ही दुसरी मुलगी बरी मिळाली त्याला?"-- पवारताई
"अहो, गरीब घरची आहे म्हणे मुलगी. मनोजकडे पाहून दिली मुलगी. आणि तिचाही पहिला घटस्फोट झाला आहेच ना?"-- राणेताई
"पहिली तर गेली..आता ही दुसरी राहिली तर बरं...नाहीतर मनोजचा संसार होणे शक्य नाही."-- पवारताई
"हो बाई, मनोजचा संसार सुखाचा होवो एवढीच अपेक्षा."-- राणेताई
"आपल्या हातात थोडीच आहे काही? सासू सूनांच जमलं तर...टिकेल मनोजचा संसार."-- पवारताई
"हो, तेही खरंच आहे म्हणा...
घरोघरी होत असतात सासूसूनांचे वाद;पण पाटीलताई जरा जास्तच करतात आणि त्यात मनोज मातृभक्त!"-- राणेताई
मनोजचे दुसरे लग्न झाले. नातेवाईक, शेजारीपाजारी सर्वांना आनंद झाला.'सुखाचा संसार होवो' अशाच सर्वांनी शुभेच्छा दिल्या.
सुरूवातीचे एकदोन महिने शांततेत गेले;पण नंतर सासूसुनेचे वाद शेजाऱ्यांच्या कानापर्यंत जाऊ लागले.पहिली शांत होती म्हणून सासूबाईंशी ती वाद घालत नव्हती. पण आता ही तोडीस तोड होती. त्यामुळे आवाज तर वाढणारच होता.ती मनोजला 'आपण वेगळे राहू' असे सांगत होती.पण मनोज आईला सोडून वेगळा राहण्यास तयार नव्हता.
सासूसूनेच्या वादात सासूचा विजय होत गेला आणि नवराबायकोच्या नात्यापेक्षा आईमुलाच्या नात्याचे पारडे जड होत गेले.या सर्वाचा जो परिणाम व्हायचा तो झालाच. मनोजची दुसरी बायकोही दिवाळीसाठी माहेरी जी गेली ती पुन्हा सासरी आलीच नाही.या प्रकरणात कोणी मध्यस्थी करायलाही तयार नव्हते आणि मग मनोजचा दुसरा घटस्फोट झाला. दोन लग्ने होऊनही संसार न करताच एकटाच राहिला. नातेवाईक, शेजारी या सर्वांना बोलण्यासाठी विषय मिळाला.मनोजबद्दल सर्वांना वाईट वाटत होते.सर्वांनी त्याला समजावून सांगितले, सल्ले दिले ; पण मनोज फक्त सर्वांचे ऐकून घ्यायचा आणि त्याच्या मनाला पटेल तेच करायचा. शेवटी लोकांनीही त्याला समजावून सांगणे सोडून दिले.'आपल्याला काय करायचे?' या भूमिकेतून सर्व पाहू लागले.
दोन सूना सोडून गेल्या तरी सासूबाईंच्या वागण्यात बदल झाला नव्हता. 'माझी काही चूक नव्हती. त्यांनाच संसार करता आला नाही.' असेच त्यांचे बोलणे असायचे.
मनोज आपल्या व्यवसायात व्यस्त असायचा आणि आईची सेवा करण्यात आनंद मानायचा. त्यामुळे झालेल्या गोष्टींचा त्याने कधी जास्त विचार केला नाही.
कधी ना कधी आपल्याला आपल्या कर्माचे फळ, परतफेड मिळत असतेच.
असेच काहीसे मनोजच्या आईच्या बाबतीत झाले होते.
क्रमशः
नलिनी बहाळकर

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
काही शंका असल्यास , जरूर कळवा.