मराठी कथा, लेख

शनिवार, २७ एप्रिल, २०२४

आंधळं प्रेम भाग 1


"अहो पवारताई, काही कळलं का तुम्हांला?"  राणेताईंनी पवारताईंना विचारले.


"काय..कशाबद्दल?" 

पवारताईंनी आश्चर्याचा भाव आणत राणेताईंना विचारले.


"अहो, पाटीलताईंच्या मनोजचे लग्न ठरले."

-- राणेताई


"काय सांगता आहेत! मला नाही माहित..तुमच्याकडूनच पहिल्यांदा ऐकते आहे.मुलगी कुठली?कधी आहे लग्न? ..."


शॉकिंग न्युज ऐकल्यासारख्या पवारताई विचारत होत्या.


"लग्न पुढच्या महिन्यात आहे.मुलगी घटस्फोटीत आहे.मलाही काही माहित नव्हते. महाजनताईंकडून समजले."


-- राणेताई


"अगोदरच एक लग्न झालेल्या  मुलाला कोणती अविवाहित  मुलगी मिळेल? मनोजचा पण पहिल्या बायकोशी घटस्फोट झाला आहे ना?" -- पवारताई


"हो ना, लग्नाला एक वर्षही होत नाही त्याअगोदरच ती माहेरी चालली गेली. दिसायला किती छान होती! आणि बोलणेही किती गोड होते तिचे!" -- राणेताई


"पण ..खतरनाक सासूपुढे काही टिकाव लागला नाही बिचारीचा. पाटीलताई आपल्या सर्वांशीच कशा वागतात? मग सूनेशी तरी चांगल्या वागणार आहेत का?"-- पवारताई


"तरी बिचारी सून शांत स्वभावाची होती.निमूटपणे ऐकून घ्यायची.पण सहनशीलतेलाही काहीमर्यादा असतात.

सहन करणाऱ्यालाच जास्त त्रास दिला जातो.

काय करणार ती पण? किती सहन करणार? गेली माहेरी कायमची  निघून." -- राणेताई


"मनोज खूप चांगला मुलगा आहे.दिसायला, वागायला,बोलायला आणि व्यवसायातही चांगली प्रगती केली आहे त्याने.आईवडिलांवर खूप जीव त्याचा.वडिलांचीही खूप सेवा केली त्याने." -- पवारताई


"आईवर पण खूप जीव आहे त्याचा. आईचा एक शब्दही खाली पडू देत नाही तो. नशीबवान आहे त्याची आई."-- राणेताई


"एवढा खतरनाक स्वभाव आहे आईचा. कोणाशीच जमत नाही त्यांचे.शेजाऱ्यांशी तर नेहमीच वाद होत असतात. घरकामाला एक बाई टिकत नाही. स्वतःची मुलगीही माहेरी लवकर येत नाही आणि आली तरी जास्त दिवस राहत नाही.एवढ सार असूनही मनोज आईला एका शब्दानेही कधी दुखवत नाही.

आई कधीही चुकत नसते.आई नेहमी बरोबरच असते.

असे त्याचे म्हणणे आहे.म्हणून तर त्याची बायको त्याला 'आई अशा बोलतात..आई अशा वागतात...' असे सांगायची तेव्हा तो तिला म्हणायचा,'तू चुकते आहे,माझी आई कधीही चुकणार नाही.'


काय खरे किंवा काय खोटे? याची पडताळणी न करताच त्याने बायकोला दोषी ठरवले.माझा  नवरा हा माझी  काही  चूक नसतानाही मला दोषी ठरवत आहे.चुकीचे समजत आहे. हे फक्त आईवरील आंधळया प्रेमामुळेच! या प्रेमामुळेच आईच्या चुका त्यांना दिसत नाही.चुका त्यांच्या आईच्या असूनही  प्रत्येक वेळी  मी माघार घ्यायची...आणि हे किती दिवस चालणार? काही दिवस? काही वर्षे? की आयुष्यभर ? 


या विचारानेच तर तिने घटस्फोट घेतला." -- पवारताई


"सासू चांगली राहिली असती किंवा मनोजने आईला समजावून सांगितले असते तर...निश्चितच मनोजचा व तिचा सुखाचा संसार झाला असता."-- राणेताई


क्रमशः

नलिनी बहाळकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काही शंका असल्यास , जरूर कळवा.

कृष्णप्रेम

 1) कान्हाच्या सावळ्या,सुंदर, मोहक मुखावर छान असे हास्य खुलते त्याच्या हास्यात एक वेगळीच जादू असते जी सर्वांना त्याच्या प्रेमाची भुरळ पाडते...