लग्न,संसार,मुले यात मी इतकी गुरफटून गेली की,कधी स्वतःच्या सुखाचा,विचारांचा,भावनांचा विचारही केला नाही. ज्याच्या वर मी प्रेम केले होते आणि त्याने मला प्रपोझही केले होते...तो इतक्या वर्षांनंतर उद्या मला भेटणार आहे. त्याच्या पुढे कशी जाऊ? त्याच्याशी काय बोलू?माझेही तुझ्यावर प्रेम होते...असे सांगू? लग्न करून मी सुखात आहे की तुझ्या प्रेमाचा स्विकार न केल्याचा पश्चाताप होतो आहे?तू तुझ्या मनातील भावना व्यक्त केल्या पण मी तर तेही करू शकले नाही.
पुरूष अविवाहित असो की विवाहित ..तो त्याच्या आवडीनिवडी जपत असतो.
मुलाने कितीही प्रेमप्रकरणे केली तरी त्याला लोक नावे ठेवत नाही. एवढे सर्व करूनही त्याला चांगली पत्नी मिळते.आणि मुली मित्र म्हणून जरी कोणा मुलाशी बोलल्या तरी त्यांना नावे ठेवणारे लोक असतात.
म्हणजे बंधने असतात फक्त स्त्रियांसाठीच? पुरूषांना का नको बंधने ?
मुलगा, नवरा ,वडील म्हणून पुरूषानेही बंधन सांभाळले तर बंधन नात्यातले त्रासदायक न वाटता उलट सुखकारकच होईल.
विचार करता करता सविताला उशीराने झोप लागली.
सकाळी आईने आवाज दिल्यावर तिला जाग आली. मुले झोपलेली होतीच. त्यांच्या अंगावरून मायेने हात फिरवला आणि ती तयारीला लागली.
पिंक कलरचा सुंदर ड्रेस घालून,हलकासा मेकअप करून ती तयार झाली.
"छान दिसते आहे." आईच्या आवाजाने ती भानावर आली.
इतका वेळ ती आरशासमोर आपलेच रूप पाहत उभी होती.एक वेगळीच लाली तिच्या चेहऱ्यावर झळाळली होती.
आईने दिलेल्या सूचना तिने ऐकल्या व ती आपल्या गेटटुगेदरच्या ठिकाणी पोहोचली.
काहीजण तिच्या अगोदर आलेले होते तर काही जण येत होते. खूप वर्षांनी एकमेकांना पाहत होते.ग्रुपवर फोटोत पाहिले होते सर्वांना; पण प्रत्यक्ष भेटीचा आनंद काही वेगळाच असतो..आणि हाच आनंद सर्वांना झाला होता. दिसण्यावरुन एकमेकांना कंमेंट्स देणे सुरू होते. एकमेकांची गंमत करणे सुरू होते.सर्वांना भेटून सविताला आनंद झाला होता;पण सविताची नजर कोणाला तरी शोधत होती.मनात सारखी धडधड होत होती.
"कशी आहेस?छान दिसते आहेस."
असे बोलत तो तिच्या समोर उभा होता.
त्याला पाहून तिला खूप आनंद झाला . पण त्याच्या प्रश्नांना लगेच उत्तर न देता..ती थोडी थांबली..
रिलॅक्स झाली आणि मग हळूच म्हणाली,
"चांगली आहे..मजेत आहे. तू कसा आहेस? आणि थँक्यू फॉर कॉम्प्लिमेंट. आणि तू ही छान दिसतो आहेस."
"मी ही मजेत ..आणि थँक्यू फॉर कॉम्प्लिमेंट. "
त्यानेही लगेच उत्तर दिले.
ईकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या.एकमेकांची विचारपूस झाली. गप्पांतून कळाले की, तो त्याच्या संसारात सुखी आहे.सविताला आनंद वाटला आणि
तिच्या मनात आले खरचं किती भाग्यवान असेल त्याची पत्नी!
'आपण ज्याच्यावर प्रेम केले होते आणि त्याच्या प्रेमाचा स्विकार मी केला असता तर..
कदाचित ती भाग्यवान मी असते. पण तेव्हाही मी बंधनात होते.आणि आता मन म्हणते की ..त्याला सांगावे ..मी माझ्या संसारात मनाने सुखी नाही.. चल आपण आपल्या नात्याची नवी सुरुवात करू...
पण हे शक्य तरी आहे का?
त्याचा सुखी संसार उध्वस्त करण्याचा विचार करणारी मी नाही आणि मी सून,पत्नी आणि दोन मुलांची आहे ..हे कसे विसरू? स्वतःच्या सुखापेक्षा इतरांच्या सुखाचा विचार करणारे माझे स्त्री मन आहे. समाजाने,कायद्याने स्त्रीवर लावलेली अनेक बंधने आहेत. इतर नात्यांची बंधने जपताना त्याच्याशी मी मैत्रीचे नाते तर जपू शकते ना?मैत्रीच्या बंधाचा आनंद तर घेऊ शकते.'
हा विचार मनात आणून सविता आपल्या गेटटुगेदरचा आनंद घेऊ लागली.
समाप्त
नलिनी बहाळकर

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
काही शंका असल्यास , जरूर कळवा.