मराठी कथा, लेख

शुक्रवार, २६ एप्रिल, २०२४

बंधन नात्यातले भाग 1

 

"आई, उद्या मी दिवसभर बाहेर राहणार आहे.पार्थ आणि सान्वी घरीच राहतील. पार्थचे काही टेंशन नाही.पण  सान्वीकडे  थोडे जास्त लक्ष द्यावे लागेल."


सविता आपल्या आईला म्हणाली.


"तू मुलांचे काही टेंशन घेऊ नकोस. मी व तुझे बाबा आम्ही दोघही मुलांना छान सांभाळू.तू  व्यवस्थित जा,काळजी घे आणि रात्र होण्याअगोदर लवकर घरी ये."


सविताची आई सविताला म्हणाली.


मुलगी कितीही मोठी झाली, तिचे लग्न झाले, ती स्वतः मुलांची आई झाली... तरी आईवडिलांसाठी ती एक मुलगीच असते आणि तिची ते नेहमीच  काळजी घेत असतात.


सविताची आईही काळजीपोटी, मायेपोटी सविताला सर्व सांगत होत्या.


शाळा व कॉलेजचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मुली लग्न करून सासरी गेल्या आणि मुले नोकरी,व्यवसायानिमित्त वेगवेगळ्या ठिकाणी स्थायिक झाले. सर्वजण आपआपल्या  संसारात, नोकरी,व्यवसायात 

रमले होते.

शाळेतील,कॉलेजातील सर्वांशीच कॉन्टॅक्ट नव्हता. एकदोन जणांशीच कॉन्टॅक्ट होता ; पण सोशल मीडियावर अनेक जण भेटले.मित्रमैत्रिणी भेटल्याने शाळेच्या,कॉलेजच्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या. शाळेचा ग्रुप,कॉलेजचा

ग्रुप...असे ग्रुप तयार झाले. वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस, सणवार यानिमित्ताने शुभेच्छा देणेघेणे सुरू झाले. आणि त्याचबरोबर  एकमेकांची विचारपूस होऊ लागली,एकमेकांची सुखदुःखे समजू लागली. ग्रुपवर बोलता बोलता आता प्रत्यक्ष भेटण्याची ओढ लागली. त्यामुळे  गेटटुगेदर करण्याचे सर्वानुमते ठरले  व त्यानुसार नियोजन सुरू झाले. दिनांक, ठिकाण ..वगैरे प्रत्येकाच्या सोयीनुसार निश्चित केले गेले.प्रत्येक जण आपआपल्या परीने प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे मदत करत होते,काम करत होते.खूप वर्षांनी  एकत्र भेटणार आहोत.याचा आनंद प्रत्येकाला झाला होता आणि त्याच आनंदात,उत्साहात सर्व जण  तयारीला लागले होते.दिवाळीला मुली माहेरी येत असतात आणि मुलेही आपल्या गावी येत असतात. त्यानुसारच  दिनांक व  गावाजवळचे ठिकाण निश्चित केले.

आणि...

 कधीच्या सुरू असलेल्या तयारीला,मनाला असलेल्या उत्सुकतेला जास्त प्रतिक्षा न करवता ..

गेटटुगेदरच्या ज्या दिवसाची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते...तो दिवस ...उद्याच येणार होता.फक्त एका रात्रीचा अवकाश.. ही रात्र केव्हा संपते आणि उद्या आपण केव्हा भेटू? या विचाराने कोणालाच  झोप येत नव्हती.


सविताही गेटटुगेदरसाठी खूप उत्साही होती.आपले कॉलेजमधील मित्रमैत्रिणी खूप वर्षांनी भेटणार.याचा तिला अतिशय आनंद झाला होता;पण ... एका वेगळ्याच गोष्टीसाठी तिचे मन धडधड करत होते.उद्या आपण कसे रिऍक्ट होऊ..काही गडबड तर होणार नाही ना? या विचाराने तिला झोपही येत नव्हती.


क्रमशः

नलिनी बहाळकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काही शंका असल्यास , जरूर कळवा.

कृष्णप्रेम

 1) कान्हाच्या सावळ्या,सुंदर, मोहक मुखावर छान असे हास्य खुलते त्याच्या हास्यात एक वेगळीच जादू असते जी सर्वांना त्याच्या प्रेमाची भुरळ पाडते...