"मी नववीत होते आणि तो दहावीत. त्याचा वर्ग माझ्या वर्गाशेजारीच होता. त्यामुळे वर्गात जाता येता बऱ्याचदा आमची नजरानजर व्हायची. वर्गातील मुलांशी कामानिमित्त माझे त्यांच्याशी बोलणे व्हायचे, तेव्हा त्यांच्याशी बोलताना, त्यांच्याकडे पाहत असताना वेगळे असे काही जाणवायचे नाही.मनात तशी काही भावना वाटत नसायची;पण हा दिसला की,माझे ह्रदय जोरजोरात धडकायचे.तो माझ्याकडे बघत असताना, त्याच्या नजरेत वेगळीच भावना जाणवायची.रोज एकदा तरी आमची नजरानजर व्हायची. ज्या दिवशी तो दिसला नाही की, मला अस्वस्थ झाल्यासारखे वाटायचे. कशातच मन लागायचे नाही.आणि तो दिसला की, मन प्रसन्न राहयचे.दिवसही छान जायचा.मला हे सर्व आवडत होते ; पण मनात एक भीतीही होती की, आपण प्रेमात पडत आहोत पण आपल्या घरात हे काही चालणार नाही. त्यामुळे या गोष्टीचा विचार करत मी पुढे न जाता तिथेच थांबण्याचे ठरवले.पण आयुष्यात आपण ज्या गोष्टींपासून दूर जाण्याचा प्रयत्न करतो तिचं गोष्ट आपल्या जवळ येत असते.
असेच माझ्या बाबतीत घडत होते.मला डान्स, गाणे अशा सर्व गोष्टींची खूप आवड होती म्हणून मी शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमात आवडीने भाग घ्यायची.तोही कार्यक्रमात सहभागी झालेला दिसायचा. तो गाणे छान म्हणायचा आणि इतर गोष्टीतही पुढे राहायचा.मनाने त्याला टाळण्याचे ठरवले होते;पण आमची भेट होत राहणे, आमचा सहवास वाढत रहावा.हे जणू आमच्या नियतीने ठरवलेलेच होते.कार्यक्रमाच्या निमित्ताने आमची भेट होत राहीली.डोळ्यातून दिसणारी एकमेकांबद्दलची भावना एकमेकांना शब्दांतून कळू लागली. त्याला मी आवडते. हे जसे मला कळत होते.तसेच तोही मला आवडतो.हे त्यालाही कळत होते.
एकमेकांना आवडतो,एकमेकांवर प्रेम आहे. हे सर्व अनुभवत होतो;पण आपल्या भावनांना शब्दांतून कधी व्यक्त केले नव्हते.
तो दहावीला होता. त्याची बोर्डाची परीक्षा सुरू होण्याअगोदर,एके दिवशी त्याने मला प्रपोझ केले आणि आनंदाच्या भरात त्याच्या प्रेमाचा स्विकार करत मीही माझे प्रेम व्यक्त केले.
दहावी नंतर पुढील शिक्षणासाठी तो कॉलेजला गेला. मी त्याच शाळेत होते.पहिल्यासारखे रोज भेटणे होत नव्हते.पण अधूनमधून भेटत होतो.
12 वी सायन्स नंतर तो इंजिनिअरिंगसाठी दुसऱ्या शहरात गेला. मी B.sc. ला ऍडमिशन घेतले.
शाळेत असताना रोज भेटायचो.नंतर आठवड्यातून एक दोनदा भेटू लागलो आणि आता तर तो दुसऱ्या शहरात असल्याने महिनोंमहिने भेट होत नव्हती. दोघांनाही खूप त्रास व्हायचा पण पर्याय नव्हता काही. शिक्षणही महत्त्वाचे होते.असेच दिवस जात होते.
कॉलेजच्या शेवटच्या वर्षात असताना माझ्यासाठी एक स्थळ आले होते.आईबाबांना खूप आवडले होते. नाव ठेवण्यासारखे नव्हतेच काही. पण माझे प्रेम दुसऱ्यावर असल्याने मी 'मला अजून शिकायचे आहे.' हे कारण सांगून लग्नाला नकार दिला.
M.Sc. साठी येथे आली. आणि होस्टेलला तुमच्यासारख्या जिवलग मैत्रीणी मिळाल्या.
क्रमशः
नलिनी बहाळकर

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
काही शंका असल्यास , जरूर कळवा.