मराठी कथा, लेख

Breaking

शनिवार, ३ जानेवारी, २०२६

लग्नगाठ भाग 19

 "वसंत दादा, तू छायासाठी स्थळ शोधतो आहे. मग माझ्या  शरदलाच दे ना तुझी छाया.  दुसऱ्याच्या घरी जाईल, त्यापेक्षा माझ्या घरी येईल. तुझी छाया सुखात राहील माझ्याकडे.  तुलाही मुलीची काही काळजी राहणार नाही."  


छायाची आत्या छायाच्या वडिलांना म्हणाली. 


बहिणीच्या शब्दाला मान देत छायाच्या वडिलांनीही या प्रस्तावाला होकार दिला.


 आपल्या लग्नाचा विषय घरात निघताच, 

'आपला जोडीदार कसा असावा?'

 हा प्रश्न प्रत्येक मुलीच्या मनात येत असतो.  निदान  थोडीफार कल्पना तरी मनात येते.

 घरात आपल्या लग्नाचा विषय निघताच, छायाच्या मनात जोडीदार म्हणून अरूण आला.


'आपला जोडीदार अरुणसारखा असावा.  शांत, प्रेमळ, समजूतदार व आपल्या विचारांशी  जुळणारे विचार असणारा. 


अरूणसारखा का?  अरुणच का नाही मग? पण आपल्या मनातील हे  घरात सांगणार कसे? आणि आपले ऐकणार तरी कोण? 

घरातील ठरवतील त्या मुलाशी लग्न करावे.  अशी प्रत्येक मुलीकडून घरातील लोकांची अपेक्षा असते.

 'आई वडील आपल्या मुलीसाठी चांगलेच बघतात. वडीलधारी व्यक्तींना अनुभव असतो. त्यांना माणसांची पारख असते.'

 अशा सगळ्या गोष्टी मुलींना सांगितल्या जातात आणि आई-वडिलांनी ठरवून दिलेल्या मुलाशी लग्न करून  त्यांना  संसार करावा लागतो.  मग तो संसार सुखाचा असो की दुःखाचा?'


 आपले लग्न शरदशी  होते आहे. हे जेव्हा छायाला कळले, तेव्हा ती मनातून नाराज झाली.


शरद जरी दिसायला सुंदर होता,हुशार होता; पण तिला शरदचे वागणे आवडत नव्हते.  त्याच्याशी तिचे कधी पटत नव्हते आणि आता त्याच्याबरोबर लग्न करून आयुष्य काढायचे?

 या विचाराने ती दुःखी होती.  पण आपले ऐकणार तरी कोण? त्यामुळे ती शांत बसली.  


शेवटी आई-वडिलांचा विचार करून, देवावर विश्वास ठेवून आणि इच्छा नसतानाही ती शरदबरोबर लग्न करायला तयार झाली.



 छाया आपल्या घरात वहिनी म्हणून आली.  याचा अरुणला खूप आनंद झाला होता. आणि छाया विषयीच्या वाटणाऱ्या त्या नाजूक भावनांना त्याने मनातून काढून,  वहिनीच्या रूपात आनंदाने तिचे स्वागत केले होते.


'कदाचीत देवाने आपली लग्नगाठ छायासोबत बांधलीच नसेल.'  अशी अरुणने मनाची समजूत काढली.



'आपला जोडीदार अरूण असावा. असे आपल्या मनात आले. आजपर्यत अरूणकडे आतेभाऊ व एक मित्र म्हणून पाहत आले.  पण लग्नाचा विषय निघताच तो डोळ्यासमोर आला.  माझ्या मनात   त्याच्याविषयी  एक वेगळीच भावना  होती का? 

मुलींना कुठे त्यांच्या मनाप्रमाणे करू देतात? त्यांच्या आयुष्याचे निर्णय घेऊ देतात?  आपली आजी, आई, मावशी, काकू.. या सर्वांचे आयुष्य बघते आहे ना. कोणाच्या आयुष्यात सुख आहे तर कोणाच्या आयुष्यात दु:ख!  तरी त्या संसार करत आहेत.

देवाने ज्याच्याशी आपली लग्नगाठ बांधली, आता त्याच्यासोबत मी पण सुखाचा संसार करेल.'  


  हा विचार मनात ठेवून छाया आनंदाने संसार करू लागली.


क्रमश:

नलिनी बहाळकर



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काही शंका असल्यास , जरूर कळवा.

धार्मिक अधर्मी

 "किती अभद्र विचार आहेत गं या माणसाचे!"   पल्लवी आपल्या मैत्रिणीला अनिताला म्हणाली.   "आता गाडी घेऊन गेला तोच ना?"  अनित...