मराठी कथा, लेख

Breaking

रविवार, ४ जानेवारी, २०२६

लग्नगाठ भाग 20


 मुला मुलींचे लग्न जुळवताना रूप, पैसा,घरदार,शिक्षण, नोकरी वगैरे गोष्टी बघितल्या जातात. 

 अगोदर एकमेकांना ओळखत नसलेले दोघे, लग्नानंतर एकमेकांच्या जीवन प्रवासाचे सोबती होतात. 

 एकमेकांना समजून घेत सुखदुःखाचे वाटेकरी होतात. 

'तुझं माझं जमेना आणि तुझ्यावाचून करमेना.'

असे म्हणत संसार करत असतात.

आपल्या पुरूषप्रधान संस्कृतीत, घरात पुरुषांचे वर्चस्व जास्त असते व स्त्रीला नेहमी झुकते माप असते.

 संसार दोघांचा असला तरी आणि  नवरा व्यसनी, व्यभिचारी कसाही असला तरी... स्त्रीने संसार चांगलाच करायचा असतो.  संसार सांभाळणे स्त्रीच्या हातात असते.  असे तिला सांगितले जाते.


 शरदचे वागणे छायाला आवडत नव्हते.  त्याच्याशी तिचे पटतही नव्हते; पण तरी तिचे त्याच्याशी लग्न झाले.

 लग्न झाल्यावर  मुलगा सुधारतो. असेच घरातल्यांना वाटत असते. त्यामुळे ते मुलाचे लग्न करून सर्व जबाबदारी त्याच्या पत्नीवर टाकून मोकळे होतात. पण तिच्या मनाचा विचार कोणीच करत नाही.


 छाया शांत, समजूतदार व संस्कारी  होती. त्यामुळे आपल्या स्वच्छंदी शरदला छान सांभाळून घेईल. असे शरदच्या आईला वाटले म्हणून  त्यांनी भावाजवळ आपली इच्छा व्यक्त केली. आणि कोणतीही अडचण न येता लग्नही छान पार पडले.

आपले सर्व गुण पणाला लावून छाया संसार करत होती.


 शरद देखणा होता, हुशार होता, व्यवसायात यशस्वी होता.  घरातील सर्वांची काळजी करणार होता; पण स्वच्छंदी   मनाचा होता.  स्वतःला वाटेल तसेच करणार होता. मित्रांबरोबर फिरणे, मजा करणे, दारू पिणे यात आनंद घेणारा होता.

 या सर्व गोष्टी छायाला आवडत नव्हत्या.  ती त्याला समजून सांगायची; पण तो तिचा  नेहमी अपमान करायचा.  ती काही बोलली की त्याचा पुरुषी अहंकार दुखावला जायचा.  त्याचे विचार तिच्यापेक्षा खूप वेगळे होते. त्यामुळे छायाला नेहमी वाईट वाटायचे.

 अरुणलाही शरदचे वागणे आवडायचे नाही. तो अनेकदा त्याला समजून सांगायचा. शरद  त्याचे ऐकायचा नाही. उलट त्याला अरुणचा राग यायचा.

 आपल्या भावामुळे छाया दुःखी आहे.  हे अरुणला समजत होते. आणि आपण काही करू शकत नाही याचे त्याला वाईट वाटायचे.



 अरुणचे लग्न झाल्यावर, अरूण व रेखाचा सुखी संसार पाहून छायाला  समाधान वाटायचे. अरूणसारखा समजूतदार व रेखासारखी गुणी पत्नी असल्यावर  संसार सुखाचा होईलच ना! असे तिला वाटायचे.


 कधी सुख तर कधी दुःख!  असा संसार करता करता छाया स्मिता व पूर्वाची आई झाली.  आता सर्व काही छान सुरू आहे. असे तिला वाटतच होते. आणि तेवढ्यात तिच्या आयुष्यात खूप मोठे दुःख आले.


 शरद त्याच्या मित्रांबरोबर कुठे फिरायला गेलेला होता.  तिथे त्याचा अपघात झाला व त्यातच तो गेला.

क्रमश:

नलिनी बहाळकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काही शंका असल्यास , जरूर कळवा.

धार्मिक अधर्मी

 "किती अभद्र विचार आहेत गं या माणसाचे!"   पल्लवी आपल्या मैत्रिणीला अनिताला म्हणाली.   "आता गाडी घेऊन गेला तोच ना?"  अनित...