आपल्या मनात जे असते, तसे झाले तर मनाला खूप आनंद होतो. आणि आपण स्वतःला तेव्हा खूप भाग्यवान समजतो. पण जेव्हा आपल्या मनात असते, ते काही कारणास्तव होत नाही, तेव्हा आयुष्यात जे घडते तेच आपले नशीब, प्रारब्ध असे समजून स्वीकारावे लागते.
शरदशी आपले झालेले लग्न हे आपले नशीब समजून छाया त्याच्याबरोबर संसार करत होती.
सहवासातून प्रेम वाढते. जीवनात येणाऱ्या सुखदुःखांच्या क्षणांनी नात्यातील प्रेम वाढते. नात्यातील दुरावा जाऊन जिव्हाळा निर्माण होतो.
या विचारांवर नवरा बायकोचे नाते टिकत असते आणि संसार सुरू सुरळीत सुरू राहतो.
शरदच्या वाईट सवयी वगैरे सोडल्या तर शरद चांगला मुलगा, चांगला भाऊ व चांगला बाप नक्कीच होता. त्याचे आपल्या कुटुंबावर खूप प्रेम होते.आपल्या मुलींवर तर त्याचा खूपच जीव होता. छायाचीही तो खूप काळजी घ्यायचा.
आपल्या आयुष्यात पुढे नक्कीच चांगले होईल. या आशेवर छाया आपले कर्तव्य पार पाडत होती. पण तिच्या नशिबाने पुन्हा तिला दगा दिला होता.
शरदशी जरी विचारांचे मतभेद होते; पण तिचा तो नवरा होता व तिच्या दोन्ही मुलींचा तो बाप होता. त्याच्या अशा अकाली जाण्याने ती पूर्णपणे खचली होती.
'असे कसे झाले?' म्हणून देवाला विचारत होती.
या दुःखाच्या प्रसंगात घरातील सर्वांनी तिला खूप आधार दिला. मुलींच्या भविष्याचा विचार करून तिने दुसरे लग्न करण्याचा मनात कधी विचारही केला नाही.
आपल्याला नातू पाहिजे होता. दोन्ही मुलीच झाल्या. म्हणून छायाच्या सासूबाई तिला नेहमी टोमणे मारायच्या. तिच्या मुलींवर जास्त प्रेम करायच्या नाही. पण आता त्यांचे वडील गेल्यावर त्या मुलींकडे बघून त्यांचे मन रडत होते.
शरदच्या अचानक जाण्याने अरुणही खूप दुःखी झाला होता. छाया व तिच्या दोन्ही मुली आता आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. आपल्याला ती व्यवस्थित पार पाडली पाहिजे. असे अरुणला वाटत होते आणि तो तसे वागतही होता.
आपली शिक्षकाची नोकरी सांभाळत, तो शरदच्या हॉटेल व्यवसायाकडे लक्ष देत होता. हॉटेलची पूर्ण मिळकत छायाच्या हाती देत तो तिला जगण्याचा आधार देत होता. बदली झाल्यामुळे दुसऱ्या गावी राहायला गेल्यावरही अरुण आपली जबाबदारी व्यवस्थित सांभाळत होता.
खूप वर्षानंतर, छायाच्या आयुष्यात स्मिताच्या लग्नामुळे सुखाचे क्षण येणार होते. पण स्मिताने असे केल्याने छायाच्या आयुष्यात पुन्हा दुःख आले होते. याचे अरुणला खूप वाईट वाटत होते. अशा परिस्थितीत आपले कर्तव्य, जबाबदारी म्हणून तो आणि रेखा गावी जात होते.
क्रमश:
नलिनी बहाळकर

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
काही शंका असल्यास , जरूर कळवा.